मुंबई, 12 ऑक्टोबर : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर त्यांनी मंगळवारी (11 ऑक्टोबर 2022) ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन स्टीव्ह वॉची भेट घेऊन त्याच्याशी क्रिकेटवर चर्चा केली. जयशंकर यांनी सिडनी क्रिकेट मैदानाला (एससीजी) भेट दिली. या वेळी त्यांना स्टीव्ह वॉने ऐतिहासिक एससीजी मैदानाबाबत माहिती दिली, तसंच या दोघांनी खेळाबद्दलही चर्चा केली. स्टीव्ह वॉसोबत भेट झाल्याची माहिती जयशंकर यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “भारत आणि ऑस्ट्रेलियाला जोडणाऱ्या अनेक गोष्टींपैकी क्रिकेट ही एक आहे. एमसीजीला भेट देण्यासाठी आणि महान खेळाडू स्टीव्ह वॉला भेटण्यासाठी वेळ काढला.” सचिन तेंडुलकरचा केला उल्लेख जयशंकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला आहे. स्टीव्ह वॉने तेंडुलकरसोबतच्या आठवणींना उजाळा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणतात, “मी क्रिकेट आणि भारताबद्दलच्या स्टीव्ह वॉच्या भावनांचं कौतुक करतो. त्यानं खास करून तेंडुलकरसोबतच्या आठवणींना उजाळा दिला."
Cricket is one of the many bonds that connect India & Australia.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 11, 2022
Took time out to visit @scg and meet a living legend,Steve Waugh.
Appreciated his warm sentiments for India,both on cricket & otherwise. Particularly taken in by the recounting of his experiences with @sachin_rt. pic.twitter.com/c9aVRLSUkv
स्टीव्ह वॉ याचं भारताशी घट्ट नातं राहिलं आहे. वॉ च्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम वर्ल्ड कप जिंकली होती; पण कॅप्टन म्हणून स्टीव्ह वॉ हा भारतात टेस्ट सीरिज जिंकण्यात अपयशी ठरला होता. तो ऑस्ट्रेलियात त्याच्या सेवाभावी कार्यासाठीही ओळखला जातो. त्याच्या नावावर क्रिकेटविश्वात अनेक विक्रम आहेत. दबावाच्या क्षणी शांतपणे खेळून टीमला विजय मिळवून देणारा, उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारा खेळाडू म्हणून स्टीव्ह वॉ ओळखला जात होता. एकेकाळी त्याच्या नावाचा चांगलाच दबदबा क्रिकेटविश्वात होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मंत्री जयशंकर यांनी स्टीव्ह वॉची घेतलेली भेट त्यामुळेच चर्चेत आहे. टीम इंडिया आखतेय नवे डावपेच; `हा` बॅट्समन ओपनिंगला येण्याची शक्यता ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना दिली भेट जयशंकर हे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या आठवडाभराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर सोमवारी (10 ऑक्टोबर 2022) त्यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मर्लेस यांची भेट घेतली, व त्यांना विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली बॅट भेट म्हणून दिली. याबाबत मर्लेस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहलीच्या स्वाक्षरीची बॅट मिळाल्याची माहिती दिली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये क्रिकेटला लोकप्रिय आहे. याच कारणामुळे जयशंकर यांनी विराट कोहलीने स्वाक्षरी केलेली बॅट ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना भेट दिली असावी.