मुंबई, 14 नोव्हेंबर: सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण (VVS Laxman) या चार क्रिकेटपटूंची फक्त भारतामध्ये नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वात मोठी प्रतिष्ठा आहे. या चौघांनी जवळपास दीड दशक टीम इंडियाची धुरा वाहिली आहे. त्यांच्या नावावर असलेले अनेक रेकॉर्ड्स याचा पुरावा आहेत. हे चौघेही आता निवृत्त झाले असले तरी त्यांची लोकप्रियता कायम आहे. क्रिकेट फॅन्सचं त्यांच्या प्रत्येक कृतीकडं लक्ष असतं.
या चौघांमधील गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण ही त्रिमूर्ती पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटसाठी एकत्र आली आहे. सौरव गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष आहे. राहुल द्रविडनं नुकताच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारला आहे. तर द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा (NCA) प्रमुख म्हणून काम करण्यास व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याने होकार दिला आहे. बीसीसीआय, टीम इंडिया आणि NCA या भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाच्या संस्थांच्या प्रमुख म्हणून आता एकेकाळचे तीन सहकारी काम करणार असून त्याचा भारतीय क्रिकेटला मोठा फायदा होणार आहे.
गांगुली-द्रविड आणि लक्ष्मण ही त्रिमूर्ती एकत्र आली असताना आता क्रिकेट फॅन्सना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची प्रतीक्षा आहे. माजी क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटसाठी योगदान द्यावं असा गांगुलीचा आग्रह असतो. गांगुलीच्या आग्रहामुळेच द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 17 नोव्हेंबरपासून सूरू होणारी सीरिज ही पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून त्याची पहिली सीरिज असेल. तर लक्ष्मणसोबतही बोलणी आता अंतिम टप्प्यात आली असून बीसीसीआय लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.
टीम इंडियासाठी द्रविड-लक्ष्मण एकत्र, गांगुलीनं पुन्हा जमवली Very Very Special जोडी
सध्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचा मेंटॉर असलेल्या सचिनसाठी बीसीसीआय काही नवं पद निर्माण करणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्याचबरोबर आगामी काळातील एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून देखील सचिनला जबाबदारी मिळू शकते. नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा मेंटॉर होता. सचिन निवृत्त झाला असला तरी तो क्रिकेटपासून दूर गेलेला नाही. त्याच्या क्रिकेटमधील अनुभवाचा फायदा भारतीय क्रिकेटला नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात सचिनसाठी गांगुली काय पद निर्माण करतो याकडं क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul dravid, Sachin tendulkar, Sourav ganguly, Team india