मुंबई, 16 जानेवारी : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाल्यानंतर या बदलांना आणखी वेग आला आहे. ही सीरिज गमावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमच्या कॅप्टनसीचा राजीनामा दिला. आता आगामी सीरिजमध्ये टेस्ट टीमला नवा कॅप्टन मिळणार आहे. नव्या कॅप्टनच्या कार्यकाळाची सुरूवात व्यापक बदलाने होणार आहे.
विराट कोहलीच्या कार्यकाळात शेवटपर्यंत टीममधील जागा टिकवणारे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना टीममधून बाहेर काढण्यात येईल. त्यांच्या जागेवर पंजाबमधील तरूण बॅटर शुभमन गिलचा (Shubaman Gill) समावेश नक्की मानला जात आहे. गिल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट सीरिज खेळू शकला नाही.
गिल यापूर्वी टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून खेळला आहे, पण नव्या कॅप्टनच्या कार्यकाळात तो मिडल ऑर्डरमध्ये खेळेल. विराटच्या राजीनाम्यानंतर रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव कॅप्टनपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. त्याचबरोबर तो श्रीलंका विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाात पुनरागमन करेल. रोहित आणि केएल राहुल (KL Rahul) ही जोडी टीम इंडियाची ओपनिंग जोडी असेल. मयंक अगरवालला दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही. त्यामुळे रोहित शर्माचं पुनरागमन झाल्यानंतर त्याला वगळले जाऊ शकते.
विराट कोहलीच्या निर्णयानंतर रोहित शर्मा Shocked, म्हणाला....
मिडल ऑर्डरमधील अन्य एका जागेसाठी हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यात चुरस आहे. या दोघांमध्ये विहारी हा सिनिअर खेळाडू असून तो टेस्ट क्रिकेट स्पेशालिस्ट आहे. चेतेश्वर पुजाराच्या जागेवर विहारी खेळू शकतो. तर श्रेयस अय्यर सकारात्मक बॅटींगसाठी ओळखला जातो. न्यूझीलंड विरुद्ध कानपूर टेस्टमध्ये पदार्पणातच त्याने शतक झळकावले होते. आता या दोघांपैकी कुणाची निवड अंतिम 11 मध्ये करायची याबाबत टीम मॅनेजमेंटला निर्णय घ्यावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.