Home /News /sport /

On This Day : दिनेश कार्तिकचा शेवटच्या बॉलवर सिक्स आणि टीम इंडियाला विजेतेपद!

On This Day : दिनेश कार्तिकचा शेवटच्या बॉलवर सिक्स आणि टीम इंडियाला विजेतेपद!

आजच्याच दिवशी तीन वर्षांपूर्वी (18 मार्च 2018) कार्तिकच्या आक्रमक खेळामुळे भारताने बांगलादेशनला अगदी शेवटच्या बॉलवर हरवून निदहास ट्रॉफी (Nidahas Trophy) जिंकली होती.

    मुंबई, 18 मार्च : भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या आगमनाच्या पूर्वीपासून ते आजही सक्रीय असलेल्या विकेट किपर- बॅट्समन दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या करियरमधील आजचा दिवस अविस्मरणीय आहे. आजच्याच दिवशी  तीन वर्षांपूर्वी (18 मार्च 2018) कार्तिकच्या आक्रमक खेळामुळे भारताने बांगलादेशला अगदी शेवटच्या बॉलवर हरवून निदहास ट्रॉफी (Nidahas Trophy 2018) जिंकली होती. श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील तिरंगी T20 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यजमान श्रीलंकेला या स्पर्धेची फायनल गाठण्यात अपयश आलं. भारत आणि बांगालदेश यांच्यात फायनल मॅच होती. भारतीय टीमचा दर्जा पाहता ही मॅच भारत सहज जिंकेल असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. बांगलादेशनं दिलेल्या 167 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारताची 18 ओव्हरनंतर 5 आऊट 133 अशी अवस्था झाली होती. भारताला जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 34 रन हवे होते. त्यावेळी मनिष पांडे (Manish Pandey) आऊट झाल्यानंतर कार्तिक बॅटिंगला आला. कार्तिकच्या आधी बॅटींगला आलेल्या विजय शंकरला (Vijay Shankar) मोठे फटके मारता येत नव्हते. त्यामुळे टीम इंडियावर दबाव वाढला होता. कार्तिकचा कमाल खेळ बांगलादेशच्या बाजूने झुकलेल्या या मॅचचं पारडं दिनेश कार्तिकने एकट्याने फिरवलं. त्याने रुबेल हुसेनच्या 19 व्या ओव्हरमध्ये  6, 4, 6, 0, 2, 4 असे 22 रन काढले. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता होती. बांगलादेशकडून शेवटची ओव्हर टाकण्यासाठी सौम्या सरकार आला. भारताकडून त्या मॅचमध्ये अजिबात फॉर्मात नसलेला विजय शंकर स्ट्राईकवर होता. शंकरनं त्या ओव्हरच्या पहिल्या पाचपैकी 4 बॉल खेळले. यामध्ये त्याने 5 रन काढले. दिनेश कार्तिकनं एक बॉलमध्ये 1 रन काढला. तर भारताला वाईड बॉलमुळे 1 रन मिळाला. सौम्या सरकारच्या पाचव्या बॉलवर शंकर आऊट झाला. त्यावेळी भारताला ही मॅच जिंकण्यासाठी एका बॉलमध्ये 5 रनची, तर मॅच सुपर ओव्हरमध्ये नेण्यासाठी 4 रनची आवश्यकता होती. ( On This Day : सचिनने घडवला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा एकमेव क्रिकेटपटू ) सौम्या सरकारच्या शेवटच्या बॉलवर दिनेश कार्तिक स्ट्राईकवर होता. त्याने मॅच सुपर ओव्हरपर्यंत नेलीच नाही. शेवटच्या बॉलवर खणखणीत सिक्स लगावला आणि भारताने निदहास ट्रॉफी जिंकली. कार्तिकने त्या मॅचमध्ये फक्त 8 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नाबाद 29 रन केले. त्याचा स्ट्राईक रेट हा 362.50 इतका होता. कार्तिकनं शेवटच्या बॉलवर लगावलेल्या सिक्ससाठी निदहास ट्रॉफीची फायनल भारतीय फॅन्सच्या कायम लक्षात राहणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, Cricket, India, Sports, Team india

    पुढील बातम्या