मुंबई, 4 ऑक्टोबर : आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, असे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. अशा स्थितीत जर एखाद्या खेळाडूला वयाच्या 16व्या वर्षीच देशासाठी खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्या पहिल्याच डावात सेंच्युरीचं वर्ल्ड रेकॉर्ड मोडलं तर? ही गोष्ट नक्कीच विलक्षण मानली जाईल. 26 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी केनियातील नैरोबी शहरात ही गोष्ट सत्यात उतरली होती. विशेष म्हणजे या सेंच्युरीच्या मदतीनं 16 वर्षीय बॅट्समनने अवघ्या सहा महिन्यांच्या आत आपल्या टीमच्या पराभवाचा बदला घेतला होता. शाहिद आफ्रिदी असं या खेळाडूचं नाव आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार असलेल्या शाहिद आफ्रिदनं 4 ऑक्टोबर 1996 रोजी नैरोबी येथे धडाकेबाज खेळी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. नैरोबी येथे श्रीलंकेविरुद्ध खेळवली गेलेली मॅच ही आफ्रिदीच्या कारकिर्दीतील दुसरीच वन-डे होती. पहिल्या मॅचमध्ये त्याला बॅटिंगची संधी न मिळाल्याने श्रीलंकेविरुद्ध त्याने खऱ्या अर्थाने बॅटिंग डेब्यु केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच बॅटिंग करताना त्याने सर्वांत वेगवान सेंच्युरी ठोकण्याचा विश्वविक्रम रचला होता. त्याचा हा विक्रम 17 वर्षं शाबूत राहिला. या धडाकेबाज खेळीच्या दोन दिवस आधी शाहिद आफ्रिदीने केनियाविरुद्ध वन-डे मध्ये पदार्पण केले होता. पण, त्या सामन्यात त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने बॅटिंग केली आणि अप्रतिम सेंच्युरी केली. त्याने अवघ्या 37 बॉलमध्ये सेंच्युरी झळकवली होती. अशी कामगिरी करून आफ्रिदीनं श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्याचा वन-डेतील सर्वांत वेगवान सेंच्युरीचा विक्रम मोडीत काढला होता. T20 World Cup : बुमराहच्या जागेवर कुणाला मिळणार वर्ल्ड कपचे तिकीट? जयसूर्याचा विक्रम मोडला सनथ जयसूर्यानं 2 एप्रिल 1996 रोजी सिंगापूर येथे खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या वन-डे सामन्यात 65 बॉलमध्ये 134 रन केले होते. ज्यात त्याने फक्त 48 बॉल खेळून 100 रन केले होते. जयसूर्यानं आपल्या बॅटच्या मदतीनं पाकिस्तानी बॉलर्सचा जोरदार समाचार घेतला होता. त्यानंतर सात महिन्यांनीच आफ्रिदीनं याचा बदला घेतला. आफ्रिदीनं 40 बॉल खेळून 11 सिक्स आणि सहा फोरच्या मदतीनं 102 रन्स केले होते. म्हणजेच त्याने फोर आणि सिक्स मारूनच 90 रन केले होते. याच सामन्यात आफ्रिदीने जयसूर्याच्या एका ओव्हरमध्ये 28 रन फटकावले होते. त्यावेळी हादेखील एक विक्रम होता. शाहिद आफ्रिदीचा सर्वांत वेगवान वन-डे सेंच्युरीचा विक्रम पुढील 17 वर्षे अबाधित राहिला. 2014 मध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला आफ्रिदीचा हा विक्रम मोडला गेला. न्यूझीलंडचा फलंदाज कोरी अँडरसननं वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डेमध्ये 36 बॉल खेळून सेंच्युरी पूर्ण केली. T20 World Cup: ‘या’ स्टार खेळाडूला बेशिस्तपणा नडला; वर्ल्डकप टीममधून मिळाला डच्चू त्यानंतर एका वर्षाच्या काळातच अँडरसनचा विक्रम मोडला गेला. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनं वन-डेतील सर्वांत वेगवान सेंच्युरी झळकवली. 18 जानेवारी 2015 रोजी जोहान्सबर्ग येथे झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या वन-डे सामन्यात त्याने अवघ्या 31 बॉल्समध्ये सेंच्युरी ठोकली. हा विक्रम अद्याप कोणी मोडू शकलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.