मुंबई, 4 जून : आयपीएल स्पर्धेत पदार्पण करण्याची अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. अर्जुन मागील सिझनपासून (IPL 2021) मुंबई इंडियन्सकडं (Mumbai Indians) आहे. मुंबईनं या सिझनमध्ये ऋतिक शौकीन ते कुमार कार्तिकेयपर्यंत अनेकांना पदार्पणाची संधी मिळाली. अर्जुनची प्रतीक्षा आणखी कायम आहे. मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बॉन्डनं अर्जुनला कौशल्य विकसित करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर महान भारतीय क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी अर्जुनला सल्ला दिला आहे.
कपिल देव अनकटमध्ये त्यांनी सांगितलं की, 'तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून सर्वजण त्याच्याबद्दल बोलत आहेत का? त्याला त्याचं काम करू द्या. त्याची तुलना सचिनशी करू नका. तेंडुलकर नावाचे फायदे आणि तोटे देखील आहेत. ब्रॅडमनच्या मुलानं त्याचं नाव बदललं. कारण तो त्या नावाचा दबाव झेलू शकला नाही. त्यानं वडिलांसारखंच व्हावं अशी सर्वांची अपेक्षा होती.
अर्जुनवर दबाव टाकू नका. तो एक तरूण खेळाडू आहे. महान क्रिकेटपटू सचिन त्याचे वडील आहेत. तर आपण त्याला सांगणारे कोण आहेत. तरीही मी त्याला सांगू इच्छितो की, मैदानात जा आणि खेळाचा आनंद घे. काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तो सचिनच्या 50 टक्के जरी बनला तरी त्याच्यापेक्षा चांगलं काहीही नसेल. सचिन अत्यंत महान होता. त्यामुळे तेंडुलकर नाव आलं की आपल्या अपेक्षा वाढतात,' असं कपिल यांनी सांगितलं.
बॉन्डनं सांगितलं कारण
मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बॉण्ड (Shane Bond) यांनी अर्जुन तेंडुलकरला या मोसमात का खेळवलं नाही, याचं कारण सांगितलं आहे. बॅटिंग आणि फिल्डिंग सुधारण्यासाठी अर्जुनला अजून बरंच ट्रेनिंग आणि कठोर परिश्रम करावे लागणार आहेत, असं त्यानं स्पष्ट केलं.
IND vs SA : राहुलच्या चुकीला माफी नाही! 4 खेळाडू जागा घेण्यासाठी सज्ज
'अर्जुन तेंडुलकरला अजूनही बरंच काम करावं लागणार आहे. तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या टीमकडून खेळता तेव्हा स्क्वॅडमध्ये असणं वेगळं आणि प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं वेगळं. त्याला अजून बरंच सुधारावं लागणार आहे. त्याच्यावर अजून बरंच काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाला संधी दिली पाहिजे असं आपण म्हणतो, पण या लेव्हलला तुम्हाला तुमची जागा सिद्ध करून मिळवावी लागते. त्याला बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तो यात सुधारणा करेल आणि टीममध्ये स्थान कमवेल, अशी अपेक्षा आहे,' असं कारण बॉन्डनं सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.