मुंबई, 27 मे : टीम इंडियाचा विकेट किपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) सध्या गुजरात टायटन्सकडून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. गुजरातकडून ओपनर म्हणून त्यानं चांगली कामगिरी केली आहे. आता रविवारी तो या स्पर्धेची फायनल देखील खेळेल. या आयपीएल सिझनची (IPL 2022) फायनल गाठणारी गुजरात ही पहिली टीम ठरलीय. गुजरातकडून प्रभावी कामगिरी करणाऱ्या साहानं बंगाल क्रिकेट टीमची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. साहानं 2007 साली बंगालकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो गेल्या 22 वर्षांपासून बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. बंगालची टीम रणजी स्पर्धेच्या नॉक आऊट फेरीत दाखल झाली आहे. त्यावेळी साहानं टीमकडून खेळावं अशी आमची इच्छा होती, असं बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी सांगितलं. ‘मी साहाशी चर्चा केली तसंच त्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले होते. पण, त्यानं नॉक आऊट राऊंड खेळण्यास इच्छूक नसल्याचं सांगितलं,’ असं दालमिया म्हणाले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ नं हे वृत्त दिलं आहे. व्हॉट्सअप ग्रुप सोडला साहानं बंगाल टीमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील सोडला आहे. ‘मी साहाच्या निर्णयावर काहीही बोलणार नाही. त्यानं त्याची भूमिका आता स्पष्ट केलीय. त्यामुळे आम्हाला देखील त्या पद्धतीनं नियोजन करता येईल,’ असं बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यानं सांगितलं. आम्ही साहाचं मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला. त्याचे लहानपणीचे कोच जयंत भौमिक यांच्या माध्यमातूनही प्रयत्न केले, पण तो बंगालकडून न खेळण्यावर ठाम आहे. आता त्यानं एनओसी मागितली तर त्याला दिली जाईल,’ असे या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. किरण नवगिरेचं जलद अर्धशतक, व्हिलॉसिटी पराभवानंतरही फायनलमध्ये! साहाने बंगाल का सोडले? यापूर्वी ऋद्धीमान साहाची पत्नी रोमी साहाने त्याच्या बंगालची टीम सोडण्याच्या निर्णयाचं कारण सांगितलं होतं. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अधिकारी देवव्रत दास यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ऋद्धीमान साहा दुखावला आहे. दास यांनी माध्यमांसमोर येऊन साहाच्या कटीबद्धतेविषयी प्रश्न उपस्थित केले. साहा जेव्हा अडचणींमध्ये होता तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी साहाला साथ द्यायची गरज होती, पण असं झालं नाही, असं साहाच्या पत्नीने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.