मुंबई, 23 मे : आयपीएल 2022 मधील सनरायझर्स हैदराबादचा प्रवास पराभवानं समाप्त झाला आहे. रविवारी झालेल्या लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जनं सनरायझर्सचा (PBKS vs SRH) 5 विकेट्सनं पराभव केला. या सिझनमध्ये सनरायझर्सनं 4 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला आणि 8 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. एकूण 12 पॉईंट्ससह पॉईंट टेबलमध्ये त्यांनी आठवा क्रमांक पटकावला.
पंजाब विरूद्धच्या पराभवानंतरही सनरायझर्स हैदराबादसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचा नियमित कॅप्टन केन विलियमसन (Kane Williamson) बाबा बनला आहे. विलियमसनच्या पत्नीनं मुलाला जन्म दिलाय. स्वत: विलियमसननं सोशल मीडियावर पत्नी आणि मुलाचा फोटो शेअर करत ही फॅन्सना ही आनंदाची बातमी कळवली असून त्याचं सर्वजण अभिनंदन करत आहेत.
केन विलियमसन दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. या प्रसंगी पत्नीसोबत उपस्थित राहण्यासाठी तो मागील आठवड्यात आयपीएल स्पर्धा सोडून न्यूझीलंडला रवाना झाला होता. विलियमसनच्या अनुपस्थितीमध्ये पंजाब किंग्ज विरूद्धच्या शेवटच्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारनं सनरायझर्सचं नेतृत्त्व केलं.
IPL 2022 : 3 वर्षांनी टीम इंडियात परतल्यानंतर कार्तिक भावुक, पहिल्याच प्रतिक्रियेत जिंकलं मन
आयपीएलच्या या सिझनमध्ये विलियनसन अपयशी ठरला. त्यानं 13 सामन्यात फक्त 19.64 च्या सरासरीनं 216 रन केले. त्यानं संपूर्ण सिझनमध्ये फक्त 1 अर्धशतक झळकावलं. विलियमसन कॅप्टन म्हणूनही या सिझनमध्ये अपयशी ठरला. हैदराबादनं पहिले दोन सामने गमावून स्पर्धेची सुरूवात केली. त्यानंतर सलग पाच सामने जिंकत टॉप 4 मध्ये जागा मिळवली. 'प्ले ऑफ' साठी दावेदार बनलेल्या हैदराबादनं स्पर्धेच्या मधल्या टप्प्यात पुन्हा एकदा लय गमावली आणि सलग 7 सामने गमावले. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी त्यांना 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्यात अपयश आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.