मुंबई, 23 मे : दक्षिण आफ्रिका विरूद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची (India vs South Africa) घोषणा झाली आहे. या मालिकेसाठी कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. तर काही नवोदीत खेळाडूंना संधी देण्यात आलीय. अनुभवी दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) आयपीएल स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात पुनरागमन केलं आहे.
या आयपीएल सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणाऱ्या कार्तिकनं आत्तापर्यंत 57.40 च्या सरासरीनं 287 रन केले असून त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 191.33 इतका आहे. आरसीबीच्या 'प्ले ऑफ' पर्यंतच्या प्रवासात फिनिशर म्हणून कार्तिकनं दिलेल्या या योगदानाचा मोठा वाटा आहे. त्याच्या याच योगदानामुळे तब्बल 3 वर्षांनी कार्तिकनं टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. तो यापूर्वी 2019 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीमकडून खेळला होता. त्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या पराभवानंतर कार्तिकला वगळण्यात आले होते.
यावर्षी 2022 साली होणारा टी20 वर्ल्ड कप खेळणे हे आपलं स्वप्न असल्याचं कार्तिकनं यापूर्वीच जाहीर केलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची झालेली निवड हे या स्वप्नपुर्तीच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल आहे. त्यामुळे साहजिकच कार्तिक या निवडीनंतर भावुक झाला होता. त्यानं या निमित्तानं एक खास ट्विट केलं असून ते आता सोशल मीडियावर व्हायरल (Tweet Viral) झालं आहे.
'तुमचा स्वत:वर विश्वास असेल, तर सर्व काही ठीक होईल. तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि विश्वासासाठी धन्यवाद... कठोर मेहनत सुरू आहे.' असं ट्विट कार्तिकनं केलं आहे.
If you believe yourself, everything will fall into place! ✨ Thank you for all the support and belief...the hard work continues... pic.twitter.com/YlnaH9YHW1
— DK (@DineshKarthik) May 22, 2022
दिनेश कार्तिकने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 143.52 च्या स्ट्राईक रेटने 399 रन केले आहेत, त्याचा सर्वाधिक स्कोअर 48 रन आहे. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकने 14 सामन्यांमध्ये 191.33 च्या स्ट्राईक रेटने 287 रन केले. नाबाद 66 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे, तसंच तो 9 वेळा नाबाद राहिला.
IPL 2022 : अखेरच्या सामन्यात पंजाबच 'किंग', हैदराबादचा शेवटही लाजिरवाणा
दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडिया : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं वेळापत्रक
9 जून- पहिली टी-20, दिल्ली
12 जून- दुसरी टी-20, कटक
14 जून- तिसरी टी-20, विशाखापट्टणम
17 जून- चौथी टी-20, राजकोट
19 जून- पाचवी टी-20, बँगलोर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, South africa, Team india