मुंबई, 6 एप्रिल : सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) आयपीएल 2022 मधील पहिले दोन सामने गमावले आहेत. या पराभवानंतर हैदराबादची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. हैदराबादच्या निराशाजनक काममगिरीमध्येही डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट टी नटराजन (T. Natarajan) याने प्रभावी कामगिरी केली आहे. नटराजनच्या खेळाची टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी प्रशंसा केली आहे.
टीम इंडियानं गेल्या वर्षाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्या दौऱ्यात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये नटराजन खेळला होता. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे जवळपास वर्षभर भारतीय टीमच्या बाहेर राहावं लागलं. टीम इंडियाला गेल्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये नटराजनची कमतरता जाणवली, असा खुलासा शास्त्री यांनी केला आहे.
शास्त्री यांनी 'इएसपीएन क्रिकइन्फो' वरील कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'मी त्याच्यासाठी प्रचंड खूश आहे. आम्हाला वर्ल्ड कपमध्ये त्याची कमतरता जाणवली. तो फिट असता तर वर्ल्ड कपमध्ये नक्की खेळला असता,' असे शास्त्रींनी सांगितले. 2021 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते.
शास्त्री यावेळी पुढे म्हणाले की, 'तो इंग्लंड विरूद्धच्या वन-डे सीरिजमध्ये जखमी झाला. आम्हाला वर्ल्ड कपमध्ये त्याची कमतरता जाणवली. तो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर आहे. तो अचूक यॉर्कर टाकतो. त्याच्याकडे चांगलं नियंत्रण आहे, तसंच तुम्ही विचार करता त्यापेक्षा तो जास्त स्पीडनं बॉलिंग करतो.
आम्ही त्याला ज्या मॅचमध्ये घेतलं त्यामध्ये विजयी झालो. त्यानं टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यावेळी आम्ही जिंकलो. टेस्ट पदार्पणानंतरही आम्ही विजयी झालो. नेट बॉलर म्हणून निवड झाल्यानंतरही तो दोन प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यात यशस्वी ठरला,' असे शास्त्री यांनी नटराजनबद्दल सांगितले.
नटराजनला सनरायझर्स हैदराबादनं 4 कोटींमध्ये खरेदी केले. त्याने लखनऊ विरूद्ध 4 ओव्हर्समध्ये 26 रन देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतरही हैदराबादचा 12 रननं पराभव झाला. आता हैदराबादची पुढील मॅच 9 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ravi shashtri, Sunrisers hyderabad