मुंबई, 16 मे : आयपीएल 2022 स्पर्धेतील (IPL 2022) लीग मॅचेसचा शेवटचा आठवडा आता सुरू झाला आहे. आता शेवटच्या 7 लीग मॅच बाकी असून 'प्ले ऑफ' मधील 3 जागा अद्याप अनिश्चित आहे. फक्त गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पहिल्या क्रमांकासह 'प्ले ऑफ' मध्ये जाणार हे नक्की आहे. आयपीएल प्ले ऑफसाठी एक महत्त्वाची लढत आज (सोमवार) दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (Delhi Capitals vs Punjab Kings) यांच्यात होत आहे.
दिल्ली आणि पंजाब या दोन्ही टीमनं सध्या 12 पैकी 6 सामने जिंकले असून 6 सामन्यांत पराभव सहन केला आहे. रनरेटच्या आधारावर दिल्ली सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. तर पंजाबचा सातवा क्रमांक आहे. या दोन्ही टीमना 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याची संधी असून त्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. जी टीम उर्वरित दोन्ही सामने जिंकेल त्यांचे 16 पॉईंट्स होणार असून त्यांना 'प्ले ऑफ' साठी पात्र होण्याची चांगली संधी आहे.
दिल्ली आणि पंजाब मॅचला आता निर्णायक महत्त्व प्राप्त झालंय. दिल्लीच्या टीमला या स्पर्धेत कोरोनाचा फटका बसला. आत्तापर्यंत दिल्लीची वाटचाल अडखळती झाली आहे. मागील तीन सिझनमध्ये प्ले ऑफ गाठणाऱ्या दिल्लीला यंदाही संधी असून त्यासाठी त्यांना पंजाबचा अडथळा दूर करावा लागेल. दुसरिकडं पंजाबची टीमही आरसीबीवर मोठा विजय मिळवत फॉर्मात आली आहे.
जॉनी बेअरस्टो, शिखर धवन या अनुभवी जोडीवर पंजाबची ओपनिंगची भिस्त असेल. तर लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा हे शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करणारे बॅटर्स पंजाबकडे आहेत. कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग या जोडीपासून दिल्लीला सावध राहावं लागेल.
IPL 2022 : रायुडूच्या निवृत्ती नाट्यावर फ्लेमिंगनं सोडलं मौन, सांगितली Inside Story
दिल्ली आणि पंजाब या लढतीमध्ये कुणीही जिंकलं तरी त्यामुळे आरसीबीचं टेन्शन वाढणार आहे. आरसीबी सध्या 14 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. पण, त्यांचा रनरेट मायनेस आहे. त्यामुळे दिल्ली किंवा पंजाब यांच्यात जिंकणाऱ्या टीमची शेवटच्या जागेसाठी आरसीबीशी लढत होईल. आरसीबीला आता गुजरात टायटन्स विरूद्ध होणारा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागेल. त्याचबरोबर दिल्ली आणि पंजाब यांच्या शेवटच्या लढतीचा निकालही अनुकूल लागेल यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.