मुंबई, 16 मे : चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) हा आयपीएल सिझन अडचणीचा ठरला आहे. चार वेळा चॅम्पियन असलेल्या या टीममधील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले. टीमला स्पर्धेतून कॅप्टन बदलावा लागला. कॅप्टन बदलल्यानंतरही कामगिरी उंचावण्यात टीमला अपयश आले. सीएसके स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आलंय. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच या टीमनं 9 सामन्यांमध्ये पराभव स्विकारला आहे. या सर्व अडचणींमध्ये सीएसकेचा प्रमुख खेळाडू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने निवृत्ती जाहीर करत खळबळ उडवली होती. रायुडूनं लगेच ते ट्विट डिलिट केले. पण, यामुळे टीममधील गोंधळ समोर आला. या सर्व वादावर सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय होते प्रकरण?
अंबाती रायुडूनं शनिवारी अचानक हा आपला शेवटचा आयपीएल सिझन असल्याचं जाहीर केलं. त्याचबरोबर त्यानं मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या टीमचे या सर्व प्रवासासाठी आभार मानले. रायुडूची निवृत्तीची घोषणा फार काळ टिकली नाही. त्यानं काही मिनिटांमध्येच ट्विट डिलिट केले.
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी या प्रकरणात माध्यमांशी बोलताना रायुडू निवृत्त होणार नसल्याचं जाहीर केलं. 'मी त्याच्याशी (रायुडू) बोललो आणि तो निवृत्त होत नाही. तो त्याच्या कामगिरीने निराश झाला होता आणि म्हणूनच त्याने ते ट्विट केले. पण, त्याने ते डिलीट केले आहे.' असे विश्वनाथन यांनी स्पष्टीकरण दिले.
काय म्हणाला फ्लेमिंग?
अंबाती रायुडूला रविवारी गुजरात टायटन्स विरूद्धच्या मॅचमध्ये विश्रांती दिली होती. नव्या खेळाडूंना संधी देण्याचा सीएसकेचा प्रयत्न रविवारी यशस्वी झाला नाही. गुजरातनं त्यांचा 7 विकेट्सनं पराभव केला. या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगनं या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. 'ती निराशाजनक गोष्ट नव्हती. ते चहाच्या कपातील एक वादळ होतं. आता सर्व शांत झालं आहे. या प्रकरणाचा आमच्या टीमवर कोणताही परिणाम झालेला नाही.' असे फ्लेमिंगने सांगितले.
IPL 2022 : विराट-रोहितच्या फॉर्मबाबत गांगुलीची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...
चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना 20 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरूद्ध होणार आहे. शेवटच्या सामन्यातही नवोदीत खेळाडूंना संधी देणार असल्याचं सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं स्पष्ट केलंय. त्यामुळे राजस्थान विरूद्ध रायुडूचे खेळणे अनिश्चित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.