मुंबई, 29 एप्रिल : कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) आयपीएल 2021 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तेव्हा तो कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा सदस्य होता. आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात तो जखमी झाल्यानं टीमच्या बाहेर गेला. टीम इंडियाच्या चायनामन बॉलरनं या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आत्तापर्यंत 8 मॅचमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपनं केकेआर विरूद्ध गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये 14 रन देत 4 विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या बॉलिंगमुळे दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) हा सामना 4 विकेट्सनं जिंकला. कुलदीपनं या सिझनमध्ये केकेआर विरूद्धच्या दोन्ही मॅचमध्ये 4-4 विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्सनं आत्तापर्यंत 8 पैकी 4 सामने जिंकले असून या सर्व सामन्यांमध्ये कुलदीप यादवच ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ आहे. त्याचबरोबर सर्वाधिक विकेट्स घेण्यासाठी असलेल्या पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये कुलदीप सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शर्यतीमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आघाडीवर असून त्यानं आत्तापर्यंत 18 विकेट्स घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये कुलदीप चहलपेक्षा फक्त एका विकेटनं मागं आहे. आणखी बरीच स्पर्धा बाकी असल्यानं ही कॅप जिंकण्याची दोन्ही बॉलर्सना समान संधी आहे. पण, पर्पल कॅप चहलनं जिंकावी, अशी इच्छा कुलदीपनं व्यक्त केली आहे. केकेआर विरूद्ध ‘प्लेयर ऑफ द मॅच’, पुरस्कार जिंकल्यानंतर कुलदीपनं सांगितलं की, ‘त्यानं (चहल) मला नेहमी प्रोत्साहन दिलं आहे. गेल्या वर्षी मी खराब फॉर्ममध्ये होतो. त्यावेळी तो फोन करून माझं मनोबल वाढवत असे. तो माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. माझी मनापासून इच्छा आहे की त्यानं यावर्षी पर्पल कॅप जिंकावी. तो गेल्या चार आयपीएल सिझनपासून जबरदस्त कामगिरी करत आहे.’ IPL मध्ये अशी कामगिरी करणारा Sunil Narine पहिला परदेशी फिरकीपटू, कारकिर्दीतील 150 विकेट्स पूर्ण केकेआरनं या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करत दिल्लीसमोर विजयासाठी 147 रनचं लक्ष्य ठेवलं होतं. दिल्लीनं हे लक्ष्य 4 विकेट्स आणि एक ओव्हर राखत पूर्ण केलं. दिल्लीने या विजयासह पंजाबला धक्का देत सहाव्या क्रमांकावर उडी मारली. दिल्लीचा आठव्या सामन्यातील हा चौथा विजय तर कोलकाताचा नवव्या सामन्यात सहावा पराभव ठरला आहे. अशा परिस्थितीत आता केकेआरचा प्लेऑफचा मार्ग आणखी खडतर बनला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.