मुंबई, 29 मे : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) 2008 नंतर यंदा पहिल्यांदाच आयपीएल फायनल (IPL 2022 Final) खेळणार आहे. राजस्थाननं 2008 साली झालेल्या पहिल्या आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. आता त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी त्यांना पुन्हा एकदा विजेतेपदाची संधी आहे. हे विजेतेपद पटकावण्यासाठी त्यांना गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) अडथळा पार करावा लागेल. गुजरातनं लीग मॅचेसमध्ये सर्वाधिक पॉईंट्स तसंच क्वालिफायर वनमधील विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानला हे विजेतेपद पटकावण्यासाठी गुजरातला पराभूत करण्याबरोबरच गेल्या 4 वर्षांमधील परंपरा मोडण्याचं देखील आव्हान आहे.
गुजरात टायटन्सनं यंदा 20 पॉईंट्स मिळवत 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळवला. तर राजस्थाननं 18 पॉईंट्स मिळवत दुसऱ्या क्रमांकासह 'प्ले ऑफ' मध्ये धडक मारली. कोलकातामध्ये झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातनं राजस्थानचा 7 विकेट्सनं पराभव केला. तर राजस्थाननं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आरसीबीला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
गुजरात आणि राजस्थान यांच्यात या सिझनमध्ये झालेल्या लढतीमध्ये गुजरातचं पारडं जड आहे. या टीममधील दोन्ही लढती गुजरात टायटन्सनं जिंकल्या आहेत. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्ससमोर आयपीएल स्पर्धेतील मागील 4 वर्षांचा इतिहास बदलण्याचं आव्हान आहे.
काय आहे इतिहास?
आयपीएल 2018 ते 2021 या कालावधीमध्ये फायनलमध्ये असलेल्या टीमच्या विरूद्ध चॅम्पियन टीमनं यापूर्वीचे सर्व सामने जिंकले होते. 2018 साली चेन्नई सुपर किंग्सनं विजेतेपद पटकावले होते. त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा सर्व चार सामन्यात पराभव केला. 2019 साली मुंबई इंडियन्सनं चेन्नईवर सर्व 4 सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. 2020 साली मुंबईनं दिल्ली कॅपिटल्सचा सर्व चार सामन्यात पराभव केला. तर 2021 साली चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धचे तीन्ही सामने जिंकत चौथ्यांदा विजेतेपद पटकावले होते.
IPL 2022 Prize Money : चॅम्पियन टीम होणार मालामाल, वाचा किती मिळणार बक्षिसाची रक्कम
गुजरात टायटन्सनं या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्ध 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे राजस्थानला तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी होत इतिहास बदलावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.