मुंबई, 30 मे : राजस्थान रॉयल्सचं (Rajasthan Royals) 14 वर्षांनी आयपीएल जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. गेल्या सिझनमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या राजस्थाननं या सिझनमध्ये जोरदार खेळ केला. खेळाच्या सर्व डिपार्टमेंटमध्ये त्यांचे खेळाडू चमकले. सर्वात जास्त रन करणारा तसंच सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू राजस्थानचा ठरला. त्यानंतरही गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) फायनलमध्ये त्यांचा पराभव केला. या पराभवाची 5 मुख्य कारणं आहेत.
टॉसचा निर्णय अंगाशी
राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय टीमला भारी पडला. राजस्थानची टीम 20 ओव्हरमध्ये 130 रनच करू शकली. वास्तविक याच पिचवर दोन दिवसांपूर्वी आरसीबी विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना झाला होता. त्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या आरसीबीनं 157 रन केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी हे पिच संथ होईल अशी अपेक्षा होती आणि तसंच घडलं. त्यामुळे टॉस हरल्यानंतरही गुजरात टायटन्सला फायदा झाला.
गुजरातचा या सिझनमध्ये टार्गेटचा पाठलाग करताना रेकॉर्ड चांगला होता. त्यांनी 8 पैकी 7 मॅच दुसऱ्यांदा बॅटींग करून जिंकल्या होत्या. तर पहिल्यांदा बॅटींग करून 7 पैकी 4 मॅच जिंकल्या होत्या. त्यामुळे पहिल्यांदा बॅटींग घेऊन सॅमसननं चूक केली.
टॉप ऑर्डरची संथ सुरूवात
राजस्थानची टॉप ऑर्डर या सामन्यात फेल गेली. जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी संथ सुरूवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन निघाला. जयस्वालनं त्याचं खातं आठव्या बॉलवर उघडलं. त्यानंतर वेगानं रन करण्याच्या दबावात तो 22 रन काढून आऊट झाला. पहिल्या विकेटसाठी बटलर आणि यशस्वी या जोडीनं 31 रनची भागिदारी केली. तर क्वालिफायर दोनमध्ये या जोडीनं 61 रनची भागिदारी केली होती.
बटलर अपयशी
जॉस बटलरला मोठी खेळी करण्यात आलेलं अपयश हे राजस्थान रॉयल्सच्या पराभवाचं तिसरं कारण ठरलं. बटलरनं क्वालिफायर 2 मध्ये नाबाद 106 रन करत टीमला विजय मिळवून दिला होता. फायनलमध्येही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण, बटलर त्यामध्ये अपयशी ठरला. 'पॉवर प्ले'च्या 6 ओव्हरमध्ये त्यानं 14 बॉलमध्ये फक्त 10 रन केले होते. बटलर पुढे 39 रन काढून आऊट झाला आणि राजस्थान मोठ्या स्कोअर करेल ही आशा संपुष्टात आली.
IPL 2022 Final : गुजरातचा राजस्थानवर 'हल्लाबोल', 5110 दिवसांनंतर आयपीएलमध्ये घडला इतिहास
राशिदवर उत्तर शोधण्यात अपयश
राशिद खानला (Rashid Khan) उत्तर शोधण्यात आलेलं अपयश हे राजस्थानच्या पराभवाचं चौथं कारण ठरलं. राशिदचा बटलर विरूद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्यानं त्याला 'पॉवर प्ले' च्या शेवटच्या ओव्हरमध्येच बॉलिंगला आणले. राशिदनं पहिल्या दोन ओव्हर अचूक टाकत राजस्थानवर दबाव वाढवला. विशेषत: बटलर त्याच्या विरूद्ध रन करताना झगडत होता.
हा दबाव कमी करण्यासाठी संजू सॅमसनला हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर मोठा फटका मारणे भाग पडले आणि तो आऊट झाला. राशिदनं चक्रव्यूह रचलं आणि पांड्यानं शिकार केली. त्यानंतर राशिदनं देवदत्त पडिक्कलला आऊट करत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. तर दुसरीकडं पांड्यानं बटलर आणि हेटमायरला आऊट केलं.
मिडल ऑर्डरचा फ्लॉप शो
या सिझनमध्ये हेटमायर आणि अश्विननं राजस्थानसाठी फिनिशर म्हणून चांगली कामगिरी केली होती. पण, फायनलमध्ये हे दोघंही फेल गेले. राजस्थानची 14 व्या ओव्हरनंतर 4 आऊट 84 अशी अवस्था होती. त्यावेळी हेटमायर आणि अश्विननं चांगली भागिदारी केली असती तर राजस्थानला चांगला स्कोर करता आला असता. या दोघांनी यापूर्वी तशा प्रकारची खेळी केली होती फायनलमध्ये त्यांना तसं करणं जमलं नाही. कोणतीही मोठी पार्टनरशिप न झाल्यानं राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals