मुंबई, 13 जानेवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 सिझनच्या ऑक्शनची तयारी (IPL 2022 Mega Auction) सुरू झाली आहे. यंदा मेगा ऑक्शन होणार असून सर्वच टीमची नव्याने रचना होणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या टीम यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरणार आहेत. त्यामुळे अनेक नव्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची लॉटरी लागू शकते. त्याचबरोबर क्रिकेटमधील दिग्गज देखील आयपीएलमध्ये खेळण्याच्या तयारीत आहेत.
इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन जो रूटने (Joe Root) देखील आयपीएल स्पर्धा खेळण्याची तयारी सुरू केली आहे. पण, त्यासाठी त्याची एक अट देखील आहे. आयपीएलमुळे त्याच्या टेस्ट कारकिर्दीवर काही परिणाम होणार नसेल तरच आपण ही स्पर्धा खेळणार असल्याचे रूटने स्पष्ट केले आहे. रूटने यापूर्वी 2018 साली झालेल्या लिलावासाठी नाव नोंदवले होते. पण, त्याला कोणत्याही टीमने खरेदी केले नाही.
'माझ्या टेस्ट क्रिकेटला फटका बसणार नाही, असं वाटलं तरच मी आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवणार आहे. इंग्लंडसाठी टेस्ट क्रिकेट खेळण्यात अडथळा निर्माण होईल, असं कोणतंही काम मी करणार नाही,' असे रूटने जाहीर केले आहे. 'इएसपीएन क्रिकइन्फो' नं हे वृत्त दिलं आहे. जो रूटसाठी 2021 हे वर्ष भलंतच यशस्वी ठरले होते. त्याने या एका कॅलेंडर वर्षात 1708 रन टेस्ट क्रिकेटमध्ये केले आहेत. यामध्ये 6 शतकांचा समावेश आहे.
रूटची टी20 कारकिर्द
जो रूटने इंग्लंडकडून 32 टी20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. यामधील 30 इनिंगमध्ये त्याने 5 अर्धशतकांसह 893 रन काढले आहेत. 90 ही त्याची सर्वोच्च संख्या आहे. रूटने आयपीएल लिलावासाठी नाव नोंदवले तर कोणती टीम त्याच्यासाठी बोली लावते याची उत्सुकता आहे.
Under 19 World Cup : टीम इंडियाची पहिली लढत दक्षिण आफ्रिकेशी, वाचा संपूर्ण वेळापत्रक
स्टार्कनेही व्यक्त केली इच्छा
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) देखील आयपीएल स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी या विषयावर विचार करत आहे. मी गेल्या 6 वर्षांपासून आयपीएल खेळलेलो नाही. टी20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आयपीएलमध्ये खेळणे हा उत्तम पर्याय आहे.याच कारणामुळे मी या स्पर्धेत खेळण्याचा विचार करत आहे.' 31 वर्षांचा स्टार्क 2015 साली आयपीएलमध्ये शेवटचं खेळला होता. त्याला 2018 साली कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) 9 कोटी 40 लाखांमध्ये खरेदी केले होते. पण, त्याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Joe root