मुंबई, 23 एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या (RR vs DC) सदस्यांनी अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. दिल्लीच्या इनिंगमधील शेवटच्या ओव्हरमध्ये ‘नो बॉल’ न दिल्यानं कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishbah Pant) खेळाडूंना परत येण्याचा इशारा केला. इतकंच नाही तर दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे (Pravin Amre) यांनी मैदानात धाव घेत निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर आणि प्रविण आमरे यांना त्यांनी शिक्षा सुनावली आहे. या सर्व प्रकाराबद्दल पंतचे राजस्थान विरूद्धच्या मॅचचे शंभर टक्के मानधन कापण्यात येणार आहे. पंतला साथ देत हात वर करणाऱ्या शार्दुल ठाकूरचे 50 टक्के मानधन कापण्यात येणार असून आमरेंवर मॅच फिसची शंभर टक्के रक्कम आणि एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे.
NEWS - Rishabh Pant, Shardul Thakur And Pravin Amre Fined For Code Of Conduct Breach.
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
More details here - https://t.co/kCjhHXjgoQ #TATAIPL #DCvRR
ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रवीण आमरे यांनी त्यांच्यावरील आरोप मान्य केले असून शिक्षा स्विकारली आहे. या सर्व प्रकरणात मॅचनंतर बोलतानाही पंतनं त्याची चूक मान्य केली होती. ‘तो नो बॉल आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला असता. डग आऊटमध्ये आम्ही सर्व निराश झालो होतो. तो नो बॉल असल्याचं सर्वांनी पाहिलं. माझ्या मते थर्ड अंपायरनं हस्तक्षेप करत नो बॉल द्यायला हवा होता. प्रविण आम्रे यांना मैदानात पाठवणे चूक होते, हे मला माहितीय. पण, आमच्याबाबतीत जे घडलं ते चूक होतं.’ असं पंत म्हणाला. IPL 2022 : अंपायरच्या निर्णयावर प्रेक्षक संतापले, वानखेडेवर चीटर-चीटरची घोषणाबाजी! Viral Video दिल्ली कॅपिटल्सनं अंपायर्सच्या निर्णायवर आक्षेप घेतल्यानं मॅच काही काळ थांबली होती. प्रवीण आम्रे यांनी मैदानात येत हा निर्णय थर्ड अंपायरकडं सोपवण्याची मागणी केली, पण मैदानातील अंपायर्स त्यांच्या निर्णायवर ठाम होते. मॅच पुन्हा सुरू झाल्यानंतर जिंकण्यासाठी आवश्यक असलेले 3 सिक्स लगावण्यात अपयश आले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा 15 रननं पराभव झाला.