मुंबई, 26 नोव्हेंबर: मागील तीन आयपीएलमध्ये 'प्ले ऑफ' गाठणारी एकमेव टीम असलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) पुढील सिझनसाठी रिटेन करणाऱ्या खेळाडूंची यादी निश्चित केली आहे. आयपीएलच्या प्रत्येक टीमना 30 नोव्हेंबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला द्यावी लागणार आहे. प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकते. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू असू शकतात. त्यानुसार दिल्लीनं 3 भारतीय आणि 1 विदेशी खेळाडू रिटेन केले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा माजी कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला कॅप्टनपदाचा हट्ट महाग पडला आहे. श्रेयसला दिल्लीनं कॅप्टनसी तर दिली नाहीच त्याचबरोबर त्याला टीममधूनही बाहेर केलं आहे. 'इसपीएन क्रिकइन्फो' नं दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीनं आयपीएल 2021 सिझनचा त्यांचा कॅप्टन ऋषभ पंतवरच (Rishabh Pant) पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. दिल्लीनं 4 खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये ऋषभ पंत, पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), अक्षर पटेल (Axar Patel) आणि एनरिक नॉर्खिया (Anirch Nortge) यांचा समावेश आहे.
पंतनंतर होतं अय्यरचं नाव...
श्रेयस अय्यर आयपीएल 2018 च्या दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन बनला होता. त्याच्याच कॅप्टनसीखाली दिल्लीनं आयपीएल 2020 मध्ये फायनल गाठली होती. मागील सिझन सुरू होण्यापूर्वी श्रेयस जखमी झाल्यानं दिल्लीच्या मॅनेजमेंटनं ऋषभ पंतला कॅप्टन केले. यंदा देखील पंतनंतर दुसऱ्या क्रमांकावर श्रेयसचे नाव दिल्लीच्या यादीमध्ये होते. मात्र त्यानं कॅप्टन होण्याचा आग्रह केल्यानं त्याला टीममधून बाहेर करण्यात आले आहे.
श्रेयस अय्यर आता फ्री एजंट बनला असून आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम त्याला ड्राफ्टमध्ये करारबद्ध करण्यासाठी संपर्क साधू शकतात. अथवा आगामी मेगा ऑक्शनमध्ये त्याला एखादी टीम करारबद्ध करू शकते.
IPL 2022: विराटसमोर धर्मसंकट,आवडत्या खेळाडूंमध्ये कुणाची करणार निवड आणि कुणाला देणार अंतर?
दिल्लीनं ऋषभ पंतनंतर 22 वर्षांचा आक्रमक मुंबईकर पृथ्वी शॉवर विश्वास दाखवला आहे. आयीएल 2020 मध्ये दिल्लीच्या टीममध्ये दाखल झालेल्या नॉर्खियानं अनुभवी कागिसो रबाडाला मागे टाकत बाजी मारली आहे. मागील दोन सिझनमध्ये नॉर्खियानं दमदार बॉलिंग केल्यानं त्याच्यावर दिल्लीनं विश्वास ठेवला आहे. तर अक्षर पटेलला त्याच्या ऑल राऊंड स्कीलमुळे अनुभवी शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागी प्राधान्य देण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, Ipl 2022, Ipl 2022 auction, Shreyas iyer