मुंबई, 18 एप्रिल : अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान (Rashid Khan) हा त्याच्या भेदक लेग स्पिन बॉलिंगसाठी जगभर प्रसिद्ध आहे. चार ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी टीमला जखडून ठेवण्याबरोबर विकेट्स घेण्याचं कौशल्यही राशिदकडं आहे. त्यामुळेच तो जगभरातील टी20 लीगमध्ये सर्वाधिक मागणी असलेला खेळाडू आहे. गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) राशिदला आयपीएल ऑक्शनपूर्वीच 15 कोटींना करारबद्ध केले होते. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध अनफिट असल्यानं खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये राशिदनं टीमची कॅप्टनसी केली. राशिदला बॉलनं फार कमाल करता आली नाही. त्यानं ती कसर बॅटनं भरून काढली. चेन्नईनं दिलेल्या 170 रनचा पाठलाग करताना गुजरातची स्थिती 13 व्या ओव्हरमध्ये 5 आऊट 87 झाली होती. या अवघड परिस्थितीमध्ये राशिदनं डेव्हिड मिलरच्या साथीनं गुजरातला संकटातून बाहेर काढलं. या दोघांनी 6 विकेट्ससाठी 70 रनची भागिदारी केली. त्यामध्ये जास्त वाटा राशिदचाच होता. गुजरातला शेवटच्या 3 ओव्हरमध्ये विजयासाठी 48 रन हवे होते. त्यावेळी राशिदनं ख्रिस जॉर्डनच्या (Chris Jordan) एकाच ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि 1 फोर लगावले. राशिदनं या ओव्हरमध्ये त्याच्या ठेवणीतले हेलिकॉप्टर शॉट्स लगावत 25 रन काढले. राशिदच्या या धुलाईनंतर शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये 23 रन इतकं सोपं समीकरण गुजरातसाठी बनलं. राशिदनं फक्त 21 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्ससह 40 रन केले. डेव्हिड मिलरच्या नाबाद 94 रन इतकेच राशिदच्या या खेळीचं महत्त्व आहे. त्यानं निर्णायक क्षणी एका ओव्हरमध्ये 25 रन करत मॅचचं पारडं गुजरातच्या बाजूनं झुकवलं. IPL 2022 : चेन्नईच्या हिरोनं केली सर्वात मोठी चूक, जडेजाचा राग अनावर! पाहा Live Video चेन्नईविरुद्धच्या या विजयासोबतच गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे. गुजरातने आतापर्यंत 6 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला असून फक्त एकाच मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. गुजरातच्या खात्यात सध्या 10 पॉईंट्स आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.