मुंबई, 24 डिसेंबर : टीम इंडियाला 2011 साली वर्ल्ड कप स्पर्धेच विजेतेपद पटकावण्यात मार्गदर्शन करणारे कोच गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. कस्टर्न यांनी यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) या टीमचे कोच म्हणून काम केले आहे. आता पुढील सिझनमध्ये ते अहमदाबाद टीमचे कोच होण्याची शक्यता आहे. सीव्हीसी कॅपिटल (CVC Capital) समुहाने अहमदाबादच्या टीमची खरेदी केली आहे. पुढील सिझनमध्ये गुजरातमधील या शहराची टीम पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे.
'क्रिकबझ' च्या रिपोर्टनुसार टीम इंडियाचे माजी हेड कोच असलेले कर्स्टन अहमदाबाद टीममध्ये ही मोठी जबाबदारी घेऊ शकतात. या शर्यतीमध्ये त्यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर आशिष नेहरा (Ashish Nehra) देखील त्यांच्यासोबत कोचिंग स्टाफमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. नेहरा आणि कस्टर्न यांनी यापूर्वी आरसीबीच्या कोचिंग स्टाफमध्ये एकत्र काम केले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने 2011 साली जिंकलेल्या वर्ल्ड कप टीमचा नेहरा सदस्य होता. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू विक्रम सोळंकी (Vikram Solanki) देखील कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
अहमदाबाद टीमचा मार्ग मोकळा
अहमदाबाद टीमला बीसीसीआयकडून अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरच टीमच्या कोचिंग स्टाफची अधिकृत घोषणा करण्यात येईल. अहमदाबादच्या टीमला बीसीसीआय लवकरच लेटर ऑफ इंटेट देणार आहे, अशी माहिती आहे. बीसीसीआयच्या तीन सदस्यीय लीगल समितीनं या विषयावर या ग्रुपला क्लीनचीट दिली असून त्यामुळे या टीमचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
IND vs SA: विराट कोहलीला मिळालं चॅलेंज, दक्षिण आफ्रिकन बॉलर घेणार कॅप्टनशी पंगा
याबाबत मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 'बीसीसीआयच्या महासभेत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सीव्हीसी कंपनीच्या संदर्भातील मालकी हक्काची माहिती देण्यात आली. यानुसार सीव्हीसीकडे युरोपीन आणि आशियाई असे दोन फंड आहेत. युरोपियन फंडचे कनेक्शन बेटींग कंपनीशी आहे, कारण युरोपमध्ये बेटींग कायदेशीर आहे. तर अहमदाबाद टीममध्ये कंपनीने आशियाई फंडातून गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा बेटींगशी संबंध नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmedabad, Cricket news, Ipl 2022