चेन्नई, 18 एप्रिल : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. त्यांनी शनिवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 13 रननं पराभव केला. या विजयाबरोबरच मुंबईची टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. तर विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी (RCB) दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.
मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला होता. या पराभवानंतर त्यांनी पुनरागमन केलं आणि पुढच्या दोन्ही मॅच जिंकल्या. मुंबईनं हैदराबादसमोर विजयासाठी 151 रनचं लक्ष्य दिलं होतं. पण, हैदराबादची टीम 137 रनवर आटोपली. मुंबईकडून राहुल चहर आणि ट्रेंट बोल्टनं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 14 रन देत एक विकेट घेतली.
मुंबईच्या बॉलरनी या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली असली, तरी हार्दिक पांड्याने केलेल्या दोन भन्नाट रन आऊटमुळे सामना मुंबईच्या बाजूने झुकला. हार्दिकने डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समद याला डायरेक्ट हिट करत रन आऊट केलं. हैदराबादकडून जॉनी बेयरस्टोने 22 बॉलमध्ये 43 रनची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने 36 आणि विजय शंकरने 28 रन केले.
यापूर्वी कायरन पोलार्डने शेवटच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने हैदराबादला विजयासाठी 151 रनचं आव्हान दिलं. पोलार्डने शेवटच्या ओव्हरच्या अंतिम दोन बॉलवर भुवनेश्वर कुमारला दोन सिक्स मारल्यामुळे मुंबईला 150 रनपर्यंत मजल मारता आली.
IPL पॉईंट टेबल
आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंत एकूण 9 सामने झाले आहेत. सध्या मुंबई इंडियन्स या टेबलमध्ये टॉपवर आहे. तर विराट कोहलीची आरसीबी दुसऱ्या आणि महेंद्रसिंह धोनीची सीएके तिसऱ्या नंबरवर आहे मुंबई आणि हैदराबाद सोडून अन्य सर्व टीमनी 2-2 मॅच खेळल्या आहेत. तर मुंबई-हैदराबादनं 3-3 मॅच खेळल्या आहेत.
( वाचा : On This Day : IPL चा झाला जन्म, पहिल्याच मॅचमध्ये वेगवान शतकाचा विक्रम )
पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये कोण अव्वल?
आरसीबीच्या हर्षल पटेलकडं सध्या सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलरला दिली जाणारी पर्पल कॅप आहे. त्यानं दोन मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या राहुल चहरनं तीन मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या असून तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये कोण टॉपवर?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या लढतीनंतर ऑरेंज कॅप कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाकडं आहे. नितीशनं 2 मॅचमध्ये 137 रन केले आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन 123 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, MS Dhoni, Mumbai Indians, Rohit sharma, Sunrisers hyderabad, Virat kohli