नवी दिल्ली, 8 मे : न्यूझीलंड आणि सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) दिल्लीहून मालदीवला गेला आहे. विल्यमसननं 10 मे पर्यंत दिल्लीतील बायो-बबलमध्ये राहणं आवश्यक होतं. मात्र राजधानीतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन त्यानं तीन दिवसांपूर्वीच दिल्ली सोडली आहे.
केन विल्यमसनसोबत न्यूझीलंडचे तीन जण शुक्रवारी मालदीवला रवाना झाले. देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमित शहरामध्ये दिल्लीचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये सुरक्षित वाटत नव्हतं. विल्यमसनसह चेन्नई सुपर किंग्सचा मिचेल सँटनर (Mitchell Santner), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कायले जेमीसन (Kyle Jamieson) आणि सीएसकेचे फिजिओ टॉमी सिमसेक हे मालदीवला रवाना झाले आहेत.
न्यूझीलंडच्या या खेळाडूंना 10 मे पर्यंत दिल्लीतील 'मिनी बायो बबल' मध्ये राहवे लागणार होते. त्यानंतर ते 18 जूनपासून भारताविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी ब्रिटनला रवाना होणार होते. सनरायझर्स हैदराबादच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार केन आणि न्यूझीलंडच्या अन्य खेळाडूंना कोरोनामुळे दिल्लीत असुरक्षित वाटत होते. त्यामुळे त्यांनी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या बोर्डाला याची काहीही कल्पना नाही.
भुवनेश्वर कुमारवर निवड समितीनं अन्याय केला आहे का?
भारताशी होणार लढत
न्यूझीलंडचे ट्रेंट बोल्ट आणि अन्य खेळाडू मायदेशी परतले आहेत. हे सर्व जण एक आठवडा कुटुंबासोबत घालवल्यानंतर ब्रिटनमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडची टीम इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा शुक्रवारी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.