मुंबई, 20 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनचा (IPL 2021) लिलाव पूर्ण झाला आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडू चांगलेच मालामाल झाले. पण ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) कमनशिबी ठरला. जागतिक क्रिकेटमधील टॉप थ्री बॅट्सनमनपैकी एक असलेल्या स्मिथची या लिलावातील किमान किंमत 2 कोटी होती. त्याला त्यापेक्षा थोडी जास्त म्हणजे 2 कोटी 20 लाख रुपयांना दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) खरेदी केलं. स्मिथसारख्या खेळाडूच्या तुलनेत ही रक्कम खूप कमी आहे. ऑस्ट्रेलियाच्या माजी कॅप्टनला धक्का ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कला (Michael Clarke) स्मिथला मिळालेली रक्कम पाहून धक्का बसला आहे. ‘विराट कोहली नंबर 1 असेल तर स्मिथही टॉप थ्रीमध्ये आहे. त्याची T20 मधील कामगिरी तितकी चांगली नाही. त्याचबरोबर त्याचा मागचा आयपीएल सिझनही फार चांगला गेला नाही. असं असलं तरी, स्मिथला मिळालेली रक्कम धक्कादायक आहे,’ असं क्लार्कनं सांगितलं. …म्हणून दुखापतीचं कारण पुढे करेल स्मिथला मागच्या वर्षी जी रक्कम मिळाली होती. तसंच त्याला स्पर्धेत एक भूमिका होती. तो राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन होता. त्यामुळे यावर्षी स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी त्याचे स्नायू दुखावले (Hamstring) तर मला आश्चर्य वाटणार नाही.’’ स्मिथ एखाद्या दुखापतीचं कारण देऊन आयपीएलमधून माघार घेईल असा दावा क्लार्कनं एका ऑस्ट्रेलियातील पॉडकास्टशी बोलताना व्यक्त केला आहे. ( वाचा : Vaathi Coming: ‘मास्टर’ अश्विनसोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO ) स्मिथसाठी यावर्षी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगुळरुनं (RCB) सर्वात प्रथम बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनंही त्यामध्ये उडी मारली. अखेर स्मिथला दिल्ली कॅपिटल्सनं बेस प्राईज पेक्षा फक्त 20 लाख रुपये जास्त म्हणजेच 2 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी केलं. स्मिथ मागच्या वर्षी राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन होता. त्याला या स्पर्धेपूर्वी राजस्थाननं रिलीज केलं होतं. आता स्मिथ दिल्लीकडून पहिल्यांदाच खेळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.