चेन्नई, 14 एप्रिल : मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध मंगळवारी झालेल्या लढतीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 10 रननं पराभव झाला. केकेआरच्या बॅट्समननं शेवटच्या पाच ओव्हरमध्ये खराब खेळ केल्यानं त्यांच्या हातातून मॅच निसटली. टीमच्या या पराभवावर केकेआरचा सहमालक शाहरुख खान (Shahrukh Khan) याने नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या नाराजीला केकेआरचा ऑल राऊंडर आंद्रे रसेलनं (Andre Russell) उत्तर दिलं आहे.
"आपल्या टीमनं अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. मी टीमच्या वतीनं सर्व केकेआर चाहत्यांची माफी मागतो. अशा आशयाचं ट्विट करुन शाहरुखनं आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झालं आहे.
काय म्हणाला रसेल?
"माझा शाहरुख खानच्या ट्विटला पाठिंबा आहे. पण मॅच संपपर्यंत तुम्ही निर्धास्त होऊ शकत नाही. शेवटी क्रिकेट हा खेळ आहे. मला अजूनही विश्वास आहे. आम्ही चांगला खेळ केला. मला आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे. आम्ही नक्कीच निराश झालो आहोत हे तुम्हाला माहिती आहे. पण अजून जग संपलेलं नाही. ही फक्त दुसरी मॅच होती. यामधून आम्ही नक्की धडा घेऊ." अशी प्रतिक्रिया रसेलनं दिली आहे. रसेल मुंबई विरुद्ध बॅट्समन म्हणून अपयशी ठरला. मात्र त्यानं बॉलिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानं फक्त 2 ओव्हर बॉलिंग करत मुंबई इंडियन्सची निम्मी टीम आऊट केली.
मुंबईच्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी दमदार सुरुवात केली होती. या दोघांनी 72 धावांची सलामी भागीदारी रचली. हे दोघेच कोलकाताच्या विजयाचा पाया रचणार असे वाटत असताना राहुल चहरनं गिलला 33 धावांवर बाद केलं. त्यानंतर चहरनं ईऑन मॉर्गन (7), राहुल त्रिपाठी (5) यांनाही पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. दुसऱ्या बाजुला असलेल्या नितीश राणाने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, त्याला आपली खेळी वाढवता आली नाही. चहरने त्यालाही बाद करत कोलकाताचे संकट वाढवलं.
IPL 2021, RCB vs SRH: डेव्हिड वॉर्नरनं टॉस जिंकला, विराटच्या टीममध्ये एक बदल
राणा बाद झाल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आपला फास अधिकच आवळला. परिणामी अपेक्षित धावा आणि चेंडू यांचं अंतर अधिक वाढत गेलं. शेवटच्या दोन षटकात बुमराह आणि बोल्टने टिच्चून गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना बोल्टनं रसेल आणि कमिन्स यांना बाद केलं. आणि मुंबईनं यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, KKR, Mumbai Indians, Sharukh khan