अबु धाबी, 01 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)मध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)चा सामना पंजाब (Kings XI Punjab)विरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी झहीर खान (Zaheer Khan)ने मुंबईचा खेळाडू दिग्विजय देशमुख (Digvijay Deshmukh)ला बॉलिंगचे धडे दिले. दिग्विजय देशमुखला बॉलिंग टिप्स देताना झहीर त्याच्याशी मराठीमध्ये बोलत होता. 2019 सालच्या आयपीएल लिलावाआधी मुंबईने झहीर खानची डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स या पदावर निवड केली होती. मुंबई इंडियन्सच्या सरावादरम्यान दिग्विजय देशमुखने झहीरला बॉलिंगवेळी पायाची जागा कुठे असायला पाहिजे? असा प्रश्न विचारला, त्यावेळी झहीरने दिग्विजयला मराठीमध्ये समजवून सांगितलं. याचसोबत नेटमध्ये कोणत्याही बॉलचा सराव करण्यासाठी एकसारखा तोच बॉल टाकायचा. जर यॉर्कर बॉल टाकायचा असेल, तर नेटमध्ये वारंवार यॉर्करचाच सराव करायचा. वारंवार त्याच गोष्टीचा सराव केल्यामुळे एका ठिकाणहून बॉल रिलीज केला तर कुठे जातो आणि दुसरीकडून रिलीज केला तर कुठे जातो, ते समजतं, असं झहीर म्हणाला. या संभाषणात झहीरने दिग्विजयला त्याच्या ऑफ कटरबद्दलही विचारलं. तसंच बॉलिंग ऍक्शन आणखी चांगली होईल, असा विश्वासही झहीर खानने दिग्विजयसोबत बोलताना व्यक्त केला.
हे वाचा- IPL 2020 : कोलकात्याकडून राजस्थानचा धुव्वा, मावी-नागरकोटीची भेदक बॉलिंग मुंबई इंडियन्सने झहीर खान आणि दिग्विजय देशमुख यांच्यातल्या संभाषणाचा हा व्हिडिओ फेसबूकवर शेयर केला आहे. झहीर खान आणि दिग्विजय देशमुख यांच्यातल्या चर्चेच्या या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक आणि शेयर केलं आहे. यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. आतापर्यंत खेळलेल्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला, तर कोलकात्याविरुद्धच््या मॅचमध्ये मुंबईने विजय मिळवला. चेन्नईविरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरविरुद्धच्या रोमांचक अशा मॅचमध्ये मुंबईला सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम सहाव्या क्रमांकावर आहे.

)







