मुंबई, 29 फेब्रुवारी : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघाने अपराजित घोडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने लंकेला पराभूत करून वर्ल्ड कपमधील सलग चौथा विजय नोंदवला. भारताने आधीच सेमीफायनलमध्ये धडक मारली. लंकेला सात विकेटने पराभूत करत भारताने साखळी फेरीत ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान पटाकवलं आहे. या विजयात भारताची फिरकीपटू राधा यादवने मोलाची कामगिरी बजावली. चार षटकात 23 धावा देत चार फलंदाजांना तिने बाद केलं. राधाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टीम इंडियात राधा यादवची निवड वयाच्या 17 व्या वर्षी झाली. मुंबईतल्या कांदिवली ते टीम इंडियापर्यंतचा तिचा प्रवास संघर्षाने भरलेला होता. तिच्या कष्टाचं फळ तिला मिळालं. भारताची खेळाडू राजेश्वरी गायकवाडला दुखापत झाली आणि तिच्या जागी राधाची वर्णी संघात लागली. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी तिची निवड झाली होती.
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील अजोशी हे राधाचं मूळगाव. सुरुवातीला तिचं शिक्षण गावातच झालं. त्यानंतर इंटरची परीक्षा पास झाल्यानंतर वडिलांसोबत मुंबईला आली. मुंबईत कांदिवलीत वडील दुधाचा व्यवसाय करतात. त्यांच्यासोबत असताना क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात मुंबईच्या संघात होती मात्र आता ती गुजरातकडून खेळते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने पुढे वाटचाल केली.

वयाच्या सहाव्या वर्षीच राधानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. तेव्हा ती गल्लीत मुलांसोबत खेळायची. त्यावेळी मुलांसोबत खेळते म्हणून तिच्या घरच्या लोकांना समाजातील लोक बोलायचे. मुलीला एवढी मोकळीक देऊ नका असंही सांगितलं जायचं. काहीवेळा तर मुलं बोलली किंवा मारहाण झाली तर अडचण निर्माण व्हायची. तरीही तिनं क्रिकेट सोडलं नाही. वडिलांनीही तिच्या या आवडीला जपलं आणि क्रिकेट खेळायला परवागी दिली.
VIDEO : कधी काळी मुलगा बनून खेळायची क्रिकेट! आता झाली 'लेडी सेहवाग'
राधा तिच्या भावंडांमध्ये सर्वात लहान. तिचे वडील एक लहान दुकान चालवतात. याच्या जोरावर मुंबईत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठिण होतं. त्याशिवाय इतर खर्चही असायचा. या सगळ्यात मुलीच्या क्रिकेटसाठी आवश्यक साहित्य घेण्यासाठीही पैसे नसायचे. तेव्हा लाकडाची बॅट तयार करून सराव करायची. घरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या स्टेडियममध्ये वडिलांसोबत सायकलवरून जायची. तिथं सराव केल्यानंतर घरी परत येताना तिला चालत यावं लागायचं. या संघर्षातून तिने कठोर मेहनत घेत भारतीय क्रिकेट संघात स्थान पटकावलं.
वाचा : वडिलांनी क्रिकेट खेळू दिलं नाही म्हणून गेली पळून आणि... मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.