मुंबई, 21 नोव्हेंबर : टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. 18 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंडदरम्यान टी-20 क्रिकेट सीरिज सुरू झाली आहे. या सीरिजमधील पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली तर दुसरी मॅच रविवारी (20 नोव्हेंबर) माऊंट मॉनगनुई येथे खेळवण्यात आली. या मॅचमध्ये टीम इंडियानं यजमान न्यूझीलंडचा 65 रन्सनी पराभव केला. सूर्यकुमार यादव, ऑल राउंडर दीपक हुड्डा आणि अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहल यांनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकही मॅचमध्ये संधी न मिळालेल्या चहलनं जबरदस्त बॉलिंग केली. दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये त्यानं किवी टीममधील दोन स्फोटक खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. युजवेंद्र चहलचा याच मॅचमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टीममधील दोन खेळाडू चहलच्या हातातील सँडविच खाताना दिसत आहेत. काय आहे व्हिडीओ? माऊंट मॉनगनुई येथील बे ओव्हल ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये पावसामुळे काही काळ व्यत्यय आला होता. तेव्हा सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जाऊन थांबले. त्याच वेळी कॅमेरामननं भारताच्या ड्रेसिंग रुमकडे कॅमेरा फोकस केला. त्यात असं दिसलं युजवेंद्र चहल सँडविच खाता-खाता सहकारी खेळाडूंशी बोलताना दिसला.
pic.twitter.com/M1LnOmkneU #INDvsNZ #TeamIndia
— Shivam Rajvanshi (@social_timepass) November 20, 2022
चहल बोलत असताना शार्दुल ठाकूर तिथे आला आणि त्याने चहलच्या हातातील सँडविच खाल्लं. त्यानंतर जवळच उभा असलेला फास्ट बॉलर मोहम्मद सिराजही चहलच्या सँडविचवर तुटून पडला. हा मजेशीर व्हिडिओ कॅमेरामननं टिपला. यावरून खेळाडूंमध्ये चेष्टा-मस्करी सोबतच परस्पर प्रेम आणि बंधुत्व किती घट्ट आहे हे स्पष्ट होतं. चहलचा हा सँडविच व्हिडिओ क्रिकेट फॅन्सना फार आवडला असून तो सोशल मीडियावर व्हारयल झाला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवच्या झंझावाती शतकाच्या बळावर (52 बॉल्समध्ये नॉट आउट 111) भारतानं सहा विकेट्सच्या बदल्यात 191 रन्स केले होते. भारतानं दिलेल्या टारगेटचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं झटपट विकेट गमावल्या. त्यामुळे यजमान टीम 18.5 ओव्हर्समध्ये फक्त 126 रन्स करू शकली. कॅप्टन केन विल्यमसनच्या (61 रन) अर्धशतकाशिवाय कोणताही किवी खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. Ind vs NZ: पंड्याच्या टीमने रोवला झेंडा… ‘हे’ 5 खेळाडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे हीरो चहल चमकला! नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये चहलला एकही मॅच खेळता आली नव्हती. त्यानंतर लगेच न्यूझीलंडला पोहचलेल्या चहलनं चांगलं पुनरागमन केलं. त्यानं 26 रन्सच्या बदल्यात दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला दोन तर भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी एक विकेट मिळाली. तीन मॅचच्या सीरिजमधील पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली होती. टीम इंडियाकडे सध्या 1-0 अशी आघाडी आहे. सीरिजमधील तिसरी टी-20 मॅच 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे होणार आहे.