माऊंट माँगानुईतल्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्याचा हीरो ठरला तो मुंबईकर सूर्यकुमार यादव. सूर्यानं यंदाच्या वर्षात दुसरं टी20 शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला.
सूर्यानं या सामन्यात 51 बॉलमध्ये नाबाद 111 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच भारताला 6 बाद 191 धावांचा डोंगर उभारता आला.
वर्ल्ड कपमध्ये एकाही मॅचमध्ये संधी न मिळालेल्या युजवेंद्र चहलला आज मात्र प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं. या संधीचा फायदा उठवताना चहलनं 26 धावात 2 विकेट्स घेतल्या.
मोहम्मद सिराजनंही या सामन्यात प्रभावी मारा करताना न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. टीम इंडियाच्या या ऑलराऊंड परफॉर्मन्समुळे दुसऱ्या टी20 आरामात विजय मिळवता आला.
ऑफ स्पिनर दीपक हुडानं न्यूझीलंडचं शेपूट झटपट गुंडाळून टीम इंडियाचा विजय सोपा केला. त्यानं या मॅचमध्ये सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.