मुंबई, 30 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) काही दिवसांपूर्वीच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झाली. या फायनलनंतर लगेच आयसीसीनं दुसऱ्या सिझनच्या तयारीला लागली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्या टेस्ट सीरिजपासून दुसरा सिझन सुरु होणार आहे. या चॅम्पियनशिपच्यापूर्वी आयसीसीनं पॉईंट सिस्टममध्ये (WTC New Points System) मोठे बदल केले आहेत.
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ रिपोर्टनुसार स्लो ओव्हर रेटचा (Slow over rate) मोठा फटका आगामी चॅम्पियनशिपमध्ये टीमना बसणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये एक टेस्ट जिंकल्यानंतर 12 पॉईंट्स, ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना 4-4 पॉईंट्स आणि टाय झाली तर दोन्ही टीमना प्रत्येकी 6-6 पॉईंट्स मिळणार आहेत. या रिपोर्टनुसार स्लो ओव्हर टाकणाऱ्या टीमला मोठा फटका बसणार आहे. प्रत्येक स्लो ओव्हरसाठी 1 पॉईंट कापण्यात येईल. या ओव्हर्सची संख्या जास्त असेल तर टीमना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे जास्त टेस्ट जिंकल्या तरी फायनलची संधी जाऊ शकते.
यापूर्वीच्या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सीरिजच्या आधारावर पॉईंट्स मिळत होते. एका सीरिजमध्ये जास्तीत जास्त 120 पॉईंट्स दिले जात. पाच टेस्टची सीरिज खेळणाऱ्या टीमला याचा मोठा फटका बसला होता. तर दोन टीम खेळणाऱ्या टीमना मोठा फायदा झाला.
मंदीत चांदी! नव्या IPL टीमची किंमत वाचून व्हाल थक्क, BCCI ला मिळणार ‘इतके’ कोटी
न्यूझीलंड खेळणार कमी टेस्ट
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडची टीम आगामी स्पर्धेत कमी टेस्ट खेळणार आहे. इंग्लंडची टीम सर्वात जास्त 21 टेस्ट खेळणार आहे. भारत 19, ऑस्ट्रेलिया 18 टेस्ट खेळेल. पाकिस्तानची टीम 14 टेस्ट खेळणार असून न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका प्रत्येकी 14 टेस्ट खेळणार आहेत. तर बांगलादेशची टीम 12 टेस्ट खेळेल.
या स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक टीमला तीन मायदेशात आणि तीन टेस्ट सीरिज विदेशात खेळाव्या लागतील. टीम इंडिया यंदा न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत मायदेशी टेस्ट सीरिज खेळेल. तर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलदेश देशांचा त्यांना दौरा करावा लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Icc, India vs england, New zealand, Sports