मुंबई, 13 जानेवारी : देशातील कोरोना पेशंट्सच्या वाढत्या संख्येने अनेक कार्यक्रमांना मर्यादा आल्या आहेत. सरकारकडून नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच आगामी काळातील परिस्थितीनुसार यामध्ये बदल होतील. देशातील ही परिस्थिती लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबाबत पर्यायी व्यवस्था (Plan B) करण्यावर बीसीसीआय विचार करत आहे.
यापूर्वी देशातील कोरोना परिस्थितीमुळे दोन आयपीएल सिझनचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. यंदा भारतामध्ये ही स्पर्धा घेण्याबाबत बीसीसीआय आघाडीवर आहे. मात्र तसे शक्य झाले नाही तर ही स्पर्धा यूएईमध्ये न होता दक्षिण आफ्रिका (South Africa) किंवा श्रीलंकेत (Sri Lanka) या देशांमध्ये होईल, असे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस' ने दिले आहे.
'आम्ही नेहमीच यूएईवर अवलंबून राहू शकत नाही. आम्हाला यूएईसाठी पर्याय शोधावा लागेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टाईमझोनचा फायदा खेळाडू आणि क्रिकेट फॅन्सना होईल,' अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या टाईम झोनमध्ये साडे तीन तासांचा फरक आहे त्याचा खेळाडू आणि फॅन्सना फायदा होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील घड्याळ भारतापेक्षा साडेतीन तास मागे आहे. याचा अर्थ आफ्रिकेत संध्याकाळी 4 वाजता पहिला बॉल पडेल तेव्हा भारतामध्ये 7 वाजलेले असतील. त्याचा ब्रॉडकास्टर्सच्या वेळेत काही फरक पडणार नाही. तसेच सामना वेळेत संपल्याने खेळाडूंना देखील विश्रांती मिळू शकेल.
टेस्ट क्रिकेटमध्येही नो बॉलवर मिळणार फ्री हिट! 600 विकेट घेणाऱ्या बॉलरचा प्रस्ताव
टीम इंडियाच्या दौऱ्याचे दक्षिण आफ्रिकेनं यशस्वीपणे आयोजन केले आहे. या दौऱ्यावर ओमिक्रॉनचे सावट होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका बोर्डानं सीारिजचे आयोजन यशस्वीपणे केले आहे. त्याचबरोबर येथील ओमिक्रॉन पेशंट्सच्या संख्येत देखील सातत्याने घट होत आहे, त्यामुळे बीसीसीआय आयपीएलचे आयोजन देखील आफ्रिकेत करण्याचा विचार करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.