मुंबई, 29 मे : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) ची विशेष ऑनलाईन बैठक आज होणार आहे. या बैठकीत आयपीएल स्पर्धेतील उर्वरित 31 सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. देशातील कोरोना महामारीचा विचार करता आगामी क्रिकेट सत्रावर चर्चा करणे हा या बैठकीचा अजेंडा आहे. यामध्ये आयसीसी टी 20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) आणि रणजी क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्याने स्थानिक खेळाडूंना नुकसानभरपाई पॅकेज देण्याच्या मुद्यावर देखील चर्चा होणे अपेक्षित आहे.
आगामी टी 20 वर्ल्ड कप भारतामध्ये होणार की युएईमध्ये यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी देशातील कोव्हिड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. उर्वरित आयपीएल स्पर्धा 18 ते 20 सप्टेंबच्या दरम्यान सुरु होणार असून 10 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेची फायनल होण्याची शक्यता आहे. यूएईमधील आबूधाबी, दुबई आणि शारजा या तीन ठिकाणी आयपीएलचे सामने खेळवले जातील.
विदेशी खेळाडूंच्या सहभागावर चर्चा
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'चार क्वालिफायर, सात डबल हेडर (एकाच दिवशी दोन मॅच) आणि दहा सिंगल हेडर (एकाच दिवशी एक मॅच) असे उर्वरित आयपीएल स्पर्धेचे स्वरुप असेल. आयपीएल स्पर्धेची सुरुवात वीकेंडला होईल आणि फायनल देखील वीकेंडला होण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेत इंग्लंडचे खेळाडू सहभागी होणार नाहीत हे त्यांच्या क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.
IPL 2021 मध्ये धोनीला होणार मोठं नुकसान, पण CSK म्हणते टेन्शन नाही!
टी20 वर्ल्ड कप कुठे होणार?
आगामी टी 20 वर्ल्ड कप भारतामध्येच घेण्याची बीसीसीआयची इच्छा आहे. मात्र अजूनही देशात सध्या रोजच्या कोरोना पेशंट्सची संख्या 1.5 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये ही स्पर्धा भारताच्या बाहेर घेण्याची सूचना आयसीसी बीसीसीआयला करु शकते. काही माजी खेळाडूंनी देखील ही स्पर्धा भारतामध्ये घेणे धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये युएईचा पर्याय बीसीसीआयसमोर आहे.
IPL साठी 'या' देशातही होणार T20 वर्ल्ड कप, ICC ची खास योजना
रणजी खेळाडूंना नुकसान भरपाई
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका देशांतर्गत क्रिकेटला बसला आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठेची रणजी क्रिकेट स्पर्धा (Ranji Trophy) यावर्षी रद्द करण्यात आली. ही स्पर्धा न झाल्याने स्थानिक क्रिकेटपटूंचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा बीसीसीआयच्या अजेंड्यावर प्रलंबित आहे. रणजी क्रिकेट खेळणाऱ्या एकूण 700 खेळाडूंना बीसीसीआयला नुकसान भरपाई द्यावी लागेल. त्यांना ही रक्कम देण्याच्या पद्धतीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, IPL 2021