मुंबई, 3 मार्च : बीसीसीआयने (BCCI) वार्षिक करारातील खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत आता 28 ऐवजी 27 खेळाडूंचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हार्दिक पांड्या, शिखर धवन या दिग्गज खेळाडूंचे डिमोशन झाले आहे. त्याचवेळी दोन मुंबईकर खेळाडूंचा फायदा झालाय. त्यांना चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळालं आहे.
भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या टी20 सीरिजमध्ये 'प्लेयर ऑफ द सीरिज' ठरलेल्या श्रेयस अय्यरचे ग्रेड सी मधून ग्रेड बी मध्ये प्रमोशन झाले आहे. 27 वर्षांच्या अय्यरने या सीरिजमध्ये 174 च्या स्ट्राईक रेटने 204 रन केले. संपूर्ण सीरिजमध्ये अय्यर एकदाही आऊट झाला नाही. श्रेयस आयसीसीच्या टी20 रँकिंगमध्येही 18 व्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या या चांगल्या कामगिरीची दखल बीसीसीआयनं घेतली असून त्याचे ग्रेड बी मध्ये प्रमोशन करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या वार्षिक पगारात 2 कोटींची वाढ झाली आहे.
टीम इंडियातील आणखी एक मुंबईकर सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीमध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आलाय. सूर्यकुमारला सी ग्रेड देण्यात आलाय. सूर्यकुमारनं मागील वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी करत लिमिटेड ओव्हर्सच्या टीममधील जागा निश्चित केली आहे. मिडल ऑर्डरमधील विश्वासू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. वेस्ट इंडिज विरूद्धच्या सीरिजमध्ये भारतीय टीमच्या विजयात त्याच्या खेळीचा मोठा वाटा होता. आता नव्या करारानुसार त्याला बीसीसीआयकडून वार्षिक 1 कोटी रूपये पगार मिळणार आहे.
BCCI चा मोठा निर्णय, शिखर धवनचे होणार 4 कोटींचे नुकसान
BCCI ची नवी करार यादी
ग्रेड ए प्लस : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.
ग्रेड ए : रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.
ग्रेड बी : अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, ईशांत शर्मा.
ग्रेड सी : शिखर धवन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मयंक अग्रवाल, सूर्यकुमार यादव, ऋद्धीमान साहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, Shreyas iyer, Suryakumar yadav