मुंबई, 19 फेब्रुवारी : भारतासह जगभरात सध्या कोरोना लसीकरणाला (Corona Vaccine) सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येत आहे. आता क्रिकेट विश्वातही पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय टीमच्या खेळाडूंचं लसीकरण करण्यात आलं आहे.
बांगलादेश क्रिकेट टीम (Bangladesh Cricket Team) पुढच्या आठवड्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्यापूर्वी बांगलादेश टीममधील प्रमुख खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना व्हॅक्सिन देण्यात आले. त्यामुळे लसीकरण झालेली बांगलादेश ही पहिली क्रिकेट टीम बनली आहे. सर्वात प्रथम सौम्य सरकार (Soumya Sarkar) ला लस टोचण्यात आली. त्यानंतर तमिम इक्बाल (Tamim Iqbal), मेहदी हसन (Mehidy Hasan), मोहम्मद नईम (Mohammad Naim) आणि टस्कीन अहमद (Taskin Ahmed) यांनी देखाल कोरोना लस घेतली.
यानंतर बांगलादेश क्रिकेट टीमच्या सपोर्ट स्टाफचं लसीकरण करण्यात आलं. यापैकी बहुतेक जण विदेशी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडं कोणतंही बांगलादेशी आयकार्ड नाही. त्यांच्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डानं विशेष सोय केली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक जलाल युनुस यांनीही लस घेतली. अन्य खेळाडूंना शनिवारी लस देण्यात येणार आहे. सर्वांनी लस घेणं आवश्यक आहे. यामुळे कोरोनाची भीती कमी होईल, असं आवाहन तमिम इक्बालनं यावेळी केलं. बांगलादेशमध्ये याच महिन्यात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. आजवर 10 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
(हे वाचा : IND vs ENG : पुणेकरांना LIVE नाही पाहता येणार शेवटची वन-डे? हे आहे कारण )
बांगलादेश टीम जाणार न्यूझीलंडच्या दौऱ्यावर
बांगलादेशची टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर तीन वन-डे आणि तीन टी-20 मॅच खेळणार आहे. 24 फेब्रुवारी रोजी ही टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील वन-डे मॅच 20,23 आणि 26 मार्च रोजी होणार आहेत. तर टी20 मॅच 28 मार्च, 30 मार्च आणि 1 एप्रिल रोजी होणार आहेत.
बांगलादेशची न्यूझीलंडमधील आजवरची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. टीमला आजवर एकही वन-डे किंवा टी-20 मॅच जिंकता आलेली नाही. त्यामुळे या दौऱ्यात न्यूझीलंडमधील पहिला विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh cricket team, Corona, Corona vaccine, Cricket news, New zealand, Vaccinated for covid 19