सिडनी, 15 मे : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात 2018 साली झालेली कसोटी मालिका बॉल टेम्परिंग प्रकरणामुळे (Ball tampering scandal) वादग्रस्त ठरली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील तो काळा दिवस होता. ऑस्ट्रेलियाचा तेंव्हाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), व्हाईस कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warener) आणि टीममधील नवा सदस्य कॅमेरुन बेनक्रॉफ्ट (Cameron Bancroft) हे तीन जण यामध्ये दोषी आढळले. सर्वांवर बंदीची कारवाई करण्यात आली.
स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी या बंदींचा कालावधी संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीममध्ये पुनरागमन केलं. तर बेनक्रॉफ्ट सध्या टीमचा दरवाजा ठोठावत आहे. स्मिथ आणि वॉर्नरच्या इशाऱ्यानंतरच बेनक्रॉफ्टनं केपटाऊन टेस्टमध्ये बॉल टेम्परिंगचा प्रकार केला होता. तीन वर्षांपूर्वी क्रिकेट विश्वाला हादरवणाऱ्या प्रसंगाबाबत बेनक्रॉफ्टनं खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
बेनक्रॉफ्टनं 'गार्डियन' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकरणात आजवर कधीही समोर न आलेली माहिती सांगितली आहे. 'बॉल टेम्परिंग प्रकरणाची माहिती बॉलर्सना होती. मात्र तरीही मला, वॉर्नरला आणि स्मिथला या प्रकरणात शिक्षा झाली. मी या प्रकरणात केलेल्या कृतीला जबाबदार आहे. पण याची माहिती टीमला होती. माझ्या कृतीचा (Ball tampering) फायदा बॉलर्सनाच होणार होता. ही एकच गोष्ट हे पटवून देण्यासाठी पुरेशी आहे.' असा गौप्यस्फोट बेनक्रॉफ्टनं केला आहे.
'मला या प्रकरणाबद्दल पुरेशी माहिती असती तर मी त्यावेळी आणखी योग्य निर्णय घेतला असता,' असा दावा बेनक्रॉफ्टनं केला आहे. मात्र टीममधील कोणत्याही बॉलरचं नाव त्यानं यावेळी घेतलं नाही.
'टीम इंडियातील गर्विष्ठ संस्कृती नष्ट करा', माजी कोचचं गांगुली आणि द्रविडला पत्र
बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर बेनक्रॉफ्टला 2019 साली दोन टेस्ट खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये तो चांगली खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियन टीममध्ये संधी मिळाली नाही. बेनक्रॉफ्टनं आजवर फक्त 10 टेस्ट आणि 1 टी 20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तो टीममध्ये स्थिरावत असतानाच बॉल टेम्परिंग प्रकरणात सापडला. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीला या प्रकरणाचा सर्वात मोठा फटका बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, David warner, Steven smith