मुंबई, 9 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलियाची टीम यंदा तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रे्लियानं 1998 साली पाकिस्तानात दौरा केला होता. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानमध्ये 3 टेस्ट सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. अॅशेस सीरिजमधील जोरदार कामगिरीनंतर उस्मान ख्वाजाची (Usman Khawaja) टीममध्ये निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल गाठण्याच्या शर्यतीमध्ये कायम राहण्यासाठी या सीरिजमध्ये त्यांना चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. पण, या दौऱ्यापूर्वी ख्वाजासमोर एक प्रश्न निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलिया टीम पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्याला दुसरे मुल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ख्वाजाला पाकिस्तान दौरा किंवा बाळाच्या जन्मावेळी उपस्थिती यापैकी एकाची निवड करण्याची वेळ ख्वाजावर आली होती. ख्वाजानं यावेळी कुटुंबापेक्षा टीमला महत्त्व देत पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माझ्या पत्नीचा मला नेहमीच पाठिंबा आहे. ऑस्ट्रेलिया टीममधील जागा पक्की करण्यासाठी मी अधिक कष्ट केले पाहिजेत हे तिला माहिती आहे,’ असं ख्वाजानं यावेळी सांगितलं. IPL 2022 : अहमदाबादच्या टीमचं नाव ठरंल, वाचा काय आहे हार्दिकच्या टीमचं नाव ख्वाजानं सिडनी टेस्टमध्ये शतक झळकावलं होतं. पाकिस्तान ही ख्वाजाची जन्मभूमी आहे. त्यामुळे हा दौरा त्याच्यासाठी आणखी खास आहे. तो यंदा पहिल्यांदाच त्याच्या जन्मदेशात टेस्ट क्रिकेट खेळणार आहे. ख्वाजाचा जन्म 18 डिसेंबर 1986 रोजी इस्लामाबादमध्ये झाला होता. तो पाच वर्षाचा असताना त्याचे कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. ख्वाजा पायलट देखील आहे. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातून यामधील डिग्री मिळवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.