लंडन, 24 सप्टेंबर: भारत आणि इंग्लंड महिला संघातली तीन वन डे सामन्यांची मालिका हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघानं 3-0 अशी निर्विवादपणे जिंकली. या मालिकाविजयासह भारतीय संघानं महान गोलंदाज झुलन गोस्वामीला विजयी निरोप दिला. झुलनच्या कारकीर्दीची सांगता करताना भारतीय महिलांनी अशा प्रकारे तिला विजयाचं खास गिफ्ट दिलं. पण भारताच्या या विजयाला वादाची किनारही लाभली. दिप्ती शर्माची ‘ती’ कृती योग्य? या सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी 170 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल केली. भारतानं इंग्लंडची 9 बाद 118 अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर 52 धावा हव्या असताना शार्लोट डीन आणि फ्रेया केम्पनं शेवटच्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी साकारली. त्यावेळी भारताच्या हातून हा सामना निसटतो की काय अशी परिस्थिती होती. पण इंग्लंडला 16 धावा असताना हरमननं दिप्ती शर्माकडे बॉल दिला. तेव्हा दिप्तीनं चलाखीनं नॉन स्ट्राईकर एन्डवर असलेल्या शार्लोट डीनला रनआऊट केलं. याआधी मंकडिंग प्रकारात मोडणाऱ्या या विकेटचा आता आयसीसीनं नव्या नियमात समावेश केला आहे. त्यामुळे थर्ड अम्पायरनं शार्लोटला आऊट दिलं. पण अशा प्रकारे आऊट झाल्यानं इंग्लिश संघानं नाराजी व्यक्त केली. हेही वाचा - MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी IPL मधूनही रिटायर्ड होणार? रविवारी करणार मोठी घोषणा, पाहा धोनीची ‘ती’ पोस्ट नियम काय सांगतो? आयसीसीनं बदललेल्या प्लेईंग कंडिशननुसार यापुढे बॉलर बॉलिंग करताना बॉल टाकायच्या आत नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समननं जर क्रीझ सोडली तर ते नियमबाह्य मानण्यात येईल. अशा वेळी जर बॉलरनं बेल्स उडवल्यास बॅट्समनला आऊट दिलं जाईल. अशा विकेटला ‘मंकडिंग’ म्हटलं जाणार नाही तर बॅट्समनला ‘रन आऊट’ दिलं जाईल. नियमानुसार लॉर्ड्स वनडेतही इंग्लंडची फलंदाज शार्लोट डीनला थर्ड अम्पायरनीही आऊट दिली. पण त्यामुळे इंग्लंडला सामना गमवावा लागला. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दिप्ती शर्मानं मात्र चलाखीनं इंग्लंडची अखेरची विकेट काढली आणि हा सामना भारताला जिंकून दिला.
A run out at the non-striker's end and India win! 🙌🏻#ENGvIND | #IWC | Scorecard: https://t.co/PAduT7xxtc pic.twitter.com/2hKYUjb0YR
— ICC (@ICC) September 24, 2022
हरमनकडून दिप्तीची पाठराखण सामना संपल्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं दिप्ती शर्माची पाठराखण केली आहे. ‘आम्ही त्याआधी इंग्लंडच्या 9 विकेट्स काढल्या होत्या. मला वाटतं आता प्रत्येकजण यावर बोलेल. पण मी माझ्या प्लेयरला सपोर्ट करते. सगळ काही झालं ते नियमांना धरुन होतं.’ असं हरमन म्हणाली.