Cheteshwar Pujara**:** अरे, हा तर वन डेतही ग्रेट**!** पाहा कसोटी स्पेशालिस्ट पुजाराची ‘रॉयल’ कामगिरी लंडन, 21 ऑगस्ट**:** चेतेश्वर पुजारा भारतीय क्रिकेटमध्ये कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. पुजारानं कसोटीत कित्येकदा भारतीय संघाला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढलंय. इतकच नव्हे तर अनेक सामने त्यानं भारताला जिंकूनही दिले आहेत. पण कसोटी संघात आपलं अढळ स्थान कायम राखणाऱ्या पुजाराला भारताच्या वन डे किंवा ट्वेन्टी ट्वेन्टी संघात मात्र स्थान मिळवता आलं नाही. त्यामुळे त्याच्यावर कसोटी स्पेशालिस्ट असा शिक्का बसला. मात्र सध्या आपण व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही कमाल दाखवू शकतो हे पुजारानं दाखवून दिलंय. कारण इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या रॉयल लंडन वन डे कपमध्ये पुजारा धावांचा अक्षरश: पाऊस पाडतोय. पुजाराची रॉयल कामगिरी पुजारा काऊंटी क्रिकेटमध्ये ससेक्स या संघाकडून खेळतो. रॉयल लंडन वन डे कपमध्ये यंदा ससेक्सकडून खेळताना पुजारानं सात सामन्यात 2 शतकं आणि 2 अर्धशतकांसह 482 धावांचा रतीब घातला आहे. त्याची सरासरी आहे तब्बल 96.40 तर त्याची स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आहे 174 धावा. चेतेश्वर पुजारा यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. काऊंटीतही पुजाराचा सुपर फॉर्म वन डे कपआधी झालेल्या काऊंटी सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजारा भन्नाट फॉर्मात दिसला. पुजारानं 8 सामन्यात 109 च्या सरासरीनं तब्बल 1094 धावा केल्या. त्यात दोन द्विशतकांसह एकूण पाच शतकांचा समावेश होता. काऊंटी चॅम्पियनशीपच्या डिव्हिजन टूमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पुजारा क्रमांकावर दुसऱ्या आहे. हेही वाचा - Asia Cup2022: भारत-पाक सामन्याआधीच मैदानाबाहेर युद्ध सुरु, पाकचा माजी कर्णधार म्हणतो…
भारताकडून केवळ पाच वन डे
रॉयल लंडन वन डेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या पुजाराला भारतीय संघाकडून मात्र फार काळ वन डे संघात खेळता आलं नाही. 34 वर्षीय चेतेश्वर पुजारानं 2010 साली कसोटी पदार्पण केलं. त्याला 2013 साली वन डेतही संधी मिळाली. पण त्याचं वन डे संघातलं स्थान फार काळ टिकलं नाही. पुजारानं भारताकडून केवळ पाच सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. त्यात त्याच्या खात्यात फक्त 51 धावा जमा आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीत पुजारानं भारताकडून एकदाही ट्वेन्टी ट्वेन्टी सामना खेळलेला नाही.

)







