मुंबई, 21 ऑगस्ट**:** पुढच्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीत (UAE) आशिया चषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारताची सलामीला लढत आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. उभय संघातला हा सामना रविवारी 28 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच मैदानाबाहेर युद्ध रंगण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या आशिया चषकात पाकिस्तानचा महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे जायबंदी झालाय. त्यामुळे भारतासाठी ही दिलासा देणारी बाब असल्याचं पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि संघाचा मुख्य प्रशिक्षक वकार युनूसनं म्हटलंय. शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज यंदा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषकात खेळू शकणार नाही. नेमका हाच धागा पकडून वकार युनूसनं ही भारतीय फलंदाजांसाठी दिलासा देणारी बाब असल्याचं म्हटलंय. कारण गेल्या वर्षी झालेल्या टी ट्वेन्टी विश्वचषकात आफ्रिदीनं भारताची आघाडीची फळी सुरुवातीलाच माघारी धाडली होती. त्यामुळे त्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात शाहीननं लोकेश राहुल आणि रोहित शर्माला पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी धाडलं होतं. तर त्यानंतर कर्णधार विराटची विकेट काढून भारताला बॅकफूटवर ढकललं होतं. तो सामना भारतानं 10 विकेट्सनी गमावला होता. वकारची सोशल मीडियात पोस्ट वकारनं सोशल मीडियात याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यानं शाहीन आफ्रिदीचा फोटो शेअर करत लिहिलंय, “आफ्रिदीची दुखापत ही भारताच्या आघाडीच्या फलंदाजांसाठी दिलासा देणारी आहे. शाहीन आशिया चषकात खेळताना दिसणार नाही याचं दु:ख आहे. लवकर फिट हो चॅम्पियन.” असं वकार युनूसनं म्हटलंय. हेही वाचा - Ind vs Zim: भर मैदानात दुर्घटना होता होता टळली… थोडक्यात बचावला ‘हा’ खेळाडू
बुमराही आशिया चषकातून आऊट
केवळ शाहीन आफ्रिदीच नव्हे तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि हुकमी एक्का जसप्रीत बुमराही आशिया चषकात खेळताना दिसणार नाही. दुखापतीमुळे बुमराला आशिया चषकातून माघार घ्यावी लागली होती. दरम्यान आशिया चषकात भारताचं प्रदर्शन पाकिस्तानविरुद्घ नेहमीच अव्वल राहिलंय. आजवर 14 सामन्यात भारतानं 8 वेळा पाकिस्तानवर मात केली आहे. तर केवळ पाच वेळा पाकिस्तानला भारतावर विजय मिळवता आला आहे.