ॲडलेड, 09 डिसेंबर: सध्या वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. त्यात पहिल्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियानं पाहुण्या संघाचा धुव्वा उडवला. तर दुसऱ्या कसोटीतही कांगारुंनी वर्चस्व राखलं आहे. पण याच कसोटीदरम्यान तंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कार पाहायला मिळाला. क्रिकेट मॅचमध्ये स्टम्प माईकमधून ग्राऊंडमध्ये खेळाडू काय बोलतात हे आपल्या कानावर पडतं. पण खेळाडू जेव्हा स्टम्प माईकच्या जवळ येतो तेव्हाच हे संभाषण किंवा खेळाडूनं केलेली कमेंट ऐकू जाते. मात्र आता खेळाडू अख्खा इनिंगमध्ये काय बोलतात हे जगाला ऐकू जाणार आहे.
माईकसह बॅट्समन मैदानात
ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा माईक लावून मैदानात उतरला. या टेक्नोलॉजीमुळे ख्वाजा आणि समोरच्या बॅट्समनमध्ये काय संभाषण होत होतं हे थेट टेलिव्हिजनवर ऐकू येत होतं. मॅचच्या सुरुवातीपासून ख्वाजा आणि वॉर्नर, ख्वाजा आणि लाबुशेन यांच्यातलं संभाषण लाईव्ह ऐकू येत होतं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Love this technology, need this in IPL. pic.twitter.com/dLjMYDDPnB
— Johns. (@CricCrazyJohns) December 9, 2022
IPL मध्येही हवी अशी टेक्नोलॉजी
अशी भन्नाट टेक्नोलॉजी आयपीएलमध्येही हवी अशी मागणी एका यूझरनं केली आहे. आयपीएलमध्ये जगभरातील खेळाडू आपला खेळ दाखवण्यासाठी मैदानात उतरतात. त्यावेळी मैदानात ते एकमेकांशी काय संभाषण साधतात? कशी रणनिती आखतात? याचं प्रेक्षकांना प्रचंड कुतूहल असतं. अशी टेक्नोलॉजी आयपीएलमध्येही आणल्यास स्पर्धेची रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - कुणाचा जबडा तुटला तर कुणाचं नाक, पण जखमी असतानाही संघासाठी खेळले होते हे क्रिकेटर
कांगारुंचं वर्चस्व
दरम्यान या मालिकेत कांगारुंनी वेस्ट इंडिजवर चांगलच वर्चस्व गाजवलं. क्रेग ब्रॅथवेटची वेस्ट इंडिज टीम ऑस्ट्रेलियात 25 वर्षांनी कसोटी जिंकण्याच्या निर्धारानं आली होती. पण पहिल्याच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं 164 धावांनी मोठा विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही कांगारुंनी पहिल्या डावात धावांचा मोठा डोंगर उभारला. 1997 साली वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियात शेवटची कसोटी जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत त्यांना कांगारुंना कसोटीत हरवता आलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports