मुंबई, 20 ऑगस्ट : अफगाणिस्तानचे (Afghanistan) नागरिक सध्या सर्व बाजूनं संकटात सापडले आहेत. तालीबानी दहशतवाद्यांनी देशावर ताबा मिळवलाय. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आहे. देशातील गंभीर परिस्थितीचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. अफगाणिस्तानच्या टीमचं टी20 वर्ल्ड कप खेळणे (T20 World Cup 2021) अनिश्चित झाले आहे. 17 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर या दरम्यान यूएई आणि ओमान या देशांमध्ये हा वर्ल्ड कप होणार आहे.
'क्रिकबझ'नं दिलेल्या बातमीनुसार आयसीसी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाशी बदललेल्या परिस्थितीबाबत चर्चा करत आहे. महिला क्रिकेटला वाचवणे ही बोर्डाची प्रमुख समस्या आहे. मागील वर्षी 25 महिला क्रिकेटपटूंना बोर्डानं करारबद्ध केले होते. तसंच त्यांच्यासाठी एक सराव शिबीर देखील घेतलं होतं. अफगाणिस्तानमध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे महिला क्रिकेटचं काय होईल? याबाबत सांगणे अशक्य असल्याची माहिती आयसीसीच्या सूत्रांनी दिली आहे. महिला टीम तालिबानमुळे बंद झाली तर त्यांचे आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व संपुष्टात येईल. कारण आयसीसीच्या नियमानुसार पूर्ण सदस्य असलेल्या देशांच्या दोन्ही टीम असणे आवश्यक आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी सीईओ शफीकउल्लाह स्तानिकजई यांनी क्रिकेटच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. निर्वासितांच्या छावणीत अफगाणिस्तानचे क्रिकेट सुरू झाले. या देशानं टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. आगामी काळातही देशात क्रिकेटचा विकास होईल, अशी मी प्रार्थना करतो असं त्यांनी सांगितलं.
धक्कादायक: अमेरिकेच्या विमानातून खाली पडून अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटूचा मृत्यू
अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान याने यापूर्वीच देशाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तो या विषयावर सातत्यानं सोशल मीडियावर लिहितो.तो सध्या इंग्लंडमधील 'द हंड्रेड' स्पर्धेत खेळत असून आयपीएल स्पर्धेत देखील खेळणार आहे.
क्रिकेट बोर्डात घुसले तालिबान
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबाननं (Taliban) तेथील क्रिकेट बोर्डावरही ताबा मिळवला आहे. तालिबानचे दहशतवादी गुरुवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (ACB) कार्यालयात घुसले. सोशल मीडियावर याचा एक फोटो व्हायरल (Photo Viral) झाला आहे. यामध्ये तालिबानी दहशतवादी एके-47 रायफल घेऊन क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात घुसले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban