सिद्धांत राज, प्रतिनिधी मुंगेर, 18 जून : विश्व कल्याणासाठी अनेकजण निस्वार्थीपणे सुख-सुविधांचा त्याग करतात. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील तारापूर नगरात राहणाऱ्या एका तरुणानेही विश्व कल्याणासाठी देवाचा धावा केला आहे. सध्याच्या भीषण उन्हात हा तरुण अनवाणी पायांनी तारापूरहून केदारनाथला जायला निघाला आहे. 1,367 किलोमीटरचं हे अंतर तो 40 दिवसांत पायी पूर्ण करणार आहे. गोलू गौरव असं त्याचं नाव असून यामागे संपूर्ण विश्वाचं भलं व्हावं आणि सनातन धर्मातील परंपरा टिकून राहाव्या असा त्याचा उद्देश आहे. सोशल मीडियावर बाबा केदारनाथ यांचे फोटो पाहून, त्यांच्याबद्दल वाचून गोलू गौरव प्रेरित झाला. त्यानंतर त्याने केदारनाथ मंदिरात पायी चालत जाऊन बाबांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. कडाक्याचं ऊन, मध्येच पडणारा पाऊस, वादळवारा याबाबत कोणताही विचार न करता गोलू या प्रवासासाठी घरून निघाला आहे.
गोलूच्या या निर्णयाबाबत कळल्यावर अनेक सामाजिक संस्थांनी त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. त्याचा प्रवास व्यवस्थित पूर्ण व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या पाठिंब्यामुळे गोलू गौरवचा आत्मविश्वास आणखी वाढला. प्रवास यशस्वी व्हावा यासाठी त्याला प्रेरणा मिळाली. Solapur News: सिद्धेश्वर तलावात आढळले चतुर्मुखी लिंग, या देशातील शिवलिंगाशी आहे साधर्म्य, Video महत्त्वाचं म्हणजे गोलूने सांगितलं की, ‘मला स्वतःसाठी काहीही मागायचं नाही. मी या प्रवासाला केवळ विश्व कल्याणासाठी निघालेलो आहे. शिवाय सनातन धर्माचा प्रचार व्हावा आणि पर्यावरण रक्षणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मी हा प्रवास करणार आहे.’ दरम्यान, गोलू दिवसाला जवळपास 30 किलोमीटरचं अंतर पार करणार आहे. गरज पडल्यास यात वाढ केली जाईल, असं तो म्हणाला.