वर्धा, 19 जुलै: आचार्य विनोबा भावे यांचा वर्धा येथील धाम नदीच्या तीरावर ऐतिहासिक आश्रम आहे. पवनार येथील परमधाम आश्रम इतिहासाची साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे. पवनारला ऐतिहासिक ओळख असून या ठिकाणी मोठ्या संख्येने देशी आणि विदेशी पर्यटक भेट देत असतात. याठिकाणी आचार्य भावे यांना सापडेल्या ऐतिहासिक मूर्ती असून त्या पर्यटक आणि अभ्यासकांना भूरळ घालत आहेत. भरत राम भेटीची सुंदर मूर्ती आचार्य विनोबा भावे 1938 साली परमधाम आश्रम, पवनार येथे वास्तव्यासाठी आले. तेव्हा शेतीसाठी जमीन खोदत असताना भरत राम भेटीचा प्रसंग दर्शविणारी एक सुंदर मूर्ती त्यांच्या हाती लागली. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी या ठिकाणी एक भव्य राममंदिर होते असे म्हणतात. त्यापैकीच ही मूर्ती, भक्ती, वैराग्य यांसारख्या गुणांचा आदर्श चित्रित करणारी मानली जाते. ईश्वरी संकेत मानून विनोबा भावे यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेच येथील प्रसिद्ध भरत राम मंदिर आहे. यादरम्यान इतरही अनेक मूर्ती व मूर्तींचे भग्नावशेष मिळालेले आहेत. मंदिराच्या परिसरातील भिंतीमधे ते जडवून ठेवले आहेत.
पावसाळ्यात धाम नदीपात्राचे विहंगम दृश्य पवनार आश्रमाला भेट देण्यासाठी आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर अनेक विदेशी पर्यटक देखील याठिकाणी येत असतात. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आणि रात्री 8 ते पहाटे 4 वाजेपर्यंत आश्रम पर्यटकांसाठी बंद असतो. याठिकाणी भिंतीत जडवून ठेवलेल्या प्राचीन काळातील मूर्ती बघण्यासाठी आणि इतिहास जाणून घेण्यासाठी अनेक अभ्यासकर्ते येतात. ज्याठिकाणी मूर्ती आहेत त्याठिकाणी गेल्यावर नदीपात्राचे विहंगम दृश्य पर्यटकांच्या नजरेत सामावते. पिकनिकला जायचंय? वर्ध्यातील ‘या’ ठिकाणाला भेट दिलीत का? Video आजही आश्रमाचे काम सुरू स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालविला जाणारा हा आश्रम महिला सक्षमीकरणाची साक्ष देतो आहे. ब्रह्मविद्या मंदिरात स्त्रियांना आध्यात्मिक साधनेचे प्रयोग करण्याची प्रेरणा देण्यात येते. येथे देश-विदेशांतील साधिका एकत्रितपणे आध्यात्मिक साधना करतात. ब्रह्मविद्या मंदिरातील वास्तव्यासाठी ‘ब्रम्हचर्य’ ही प्रमुख अट आहे. या आश्रमात कुणीही प्रमुख नाही, कुणी मालक नाही आणि कुणी नोकरही नाही. स्वतःचे काम स्वतःच करायचे हा येथील शिरस्ता आहे. ‘आपण इतरांवर व समाजावर भार होता कामा नये’, ही विनोबाजींची शिकवण असल्याने आश्रमातील सर्व कामे येथील साधिकाच करतात. आजही विनोबा भावे यांच्या विचारांवर पवनार आश्रमाचे कार्य सुरू आहे, असे आश्रमातील सेविका कांचन दिदी सांगतात.