साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 12 मे : अप्रतिम स्थापत्यकलेचा नमुना असणारे एक मंदिर असे म्हटले की सहसा आपल्या डोळ्यांसमोर ऐतिहासिक पौराणिक मंदिरे येतात. पण सध्याच्या काळातील काही मंदिरे देखील त्यांच्यातच एक विशेष बाब ठरत असतात. असेच एक छोटे मंदिर कोल्हापुरातील एका सोसायटीने बांधले आहे. जरी एका सोसायटीचे हे मंदिर असले, तरी या मंदिराला चक्क संपूर्ण भारतातून सर्वोत्कृष्ट स्थापत्यकलेबद्दलचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडजवळ जिल्हा परिषद कॉलनी या ठिकाणी अगदी हे अनोखे नागेश्वर मंदिर आहे. खरंतर पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या नागांची पूजा करणे योग्य असले तरी चित्रपटातून आणि साहित्यातून अतिरंजीत गैरसमज निर्माण केले आहेत. त्यामुळे शास्त्रशुध्द माहितीच्या आधारे समाजात प्रबोधन करून अंधश्रध्दा दूर करणे आणि श्रध्दापूर्वक नागदेवतेचे पूजन करणे, हाच हे मंदिर उभारण्यामागचा उद्देश असल्याचे नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजित तांबेकर यांनी सांगितले आहे.
नागदेवाचे अनोखे मंदिर
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मस्तकावर नागदेवता आहे. याच नागदेवतेचे हे स्वतंत्र मंदिर म्हणजे श्री नागेश्वर मंदिर आहे. खरंतर शिवालय आणि त्यासोबत नागमंदिर अशी संकल्पना असताना अशा स्वरूपाची काही मंदिरे कोल्हापूरात आहेतच. मात्र केवळ नागदेवतेची उपासनाक्षेत्र म्हणून नागांच्या 9 कुळांचे शिल्पांकन असणारे असे हे श्री नागेश्वर मंदिर 30 एप्रिल 2017 पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
कसे आहे मंदिर?
हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा योग्य अभ्यास करुन उभारण्यात आले आहे. त्यानुसार मंदिराचा खालचा पायथा हा 6 फुटांचा, 9 फूट उंच भिंत आणि 13 फुटांचे शिखर असे हे मंदिर उभारण्यात आले आहे. ज्या प्रमाणे गणेश मंदिरात अष्ट विनायकांची शिल्पे असतात. देवीच्या मंदिरात योगिनी किंवा नवदुर्गा असतात. तसेच करवीर क्षेत्रात पश्चिमेला असणाऱ्या या शेषनागाच्या अष्टकोनी मंदिरात नागांच्या 9 कुळांचे दर्शन घेता येते.
यामध्ये आठ भिंतींवर बाहेरच्या बाजूला नागदेवतेच्या कुळातील आठ प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. तर या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या शिखरावर शेषनाग वेटोळा घातल्याचे शिल्प साकारण्यात आले आहे आणि त्या वेटोळ्यांचाच वापर शिखर म्हणून करण्यात आला आहे. तर या मंदिरात असणारी नगदेवतेची मूर्ती कोल्हापूरच्या केर्ली गावातून शिल्पकार बाजीराव गवळी यांच्याकडून घडवून घेण्यात आली आहे.
'या' मंदिराला एकही खांब नाही, वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना, पाहा हा VIDEO
मध्यान्ह किरणोत्सव हे मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य
या मंदिराच्या शिखरावर शेषनाग शिल्प कोरण्यात आले आहे. तर त्याच्यावर एक कोरीव काचेचा गोळा बसवण्यात आला आहे. त्यामुळे एक अनोखी खगोलीय घटना असणाऱ्या झिरो शॅडोडेच्या दिवशी गर्भ गृहातील मूर्तीवर दुपारी ठीक बारा वाजता वरच्या बाजूने किरणोत्सव सोहळा घडत असतो. वरचा काचेचा गोळा हा कोरलेला असल्यामुळे हा सूर्यप्रकाश एकाच ठिकाणी न पडता, किरणे गर्भगृहात विखुरली जातात. या घटनेवेळी नागदेवतेच्या मूर्तीवर सुंदर पद्धतीने मध्यान्ह काळी किरणोत्सव सोहळा पार पडतो.
सर्वोकृष्ट स्थापत्शास्त्राचा पुरस्कार
मंदिराचे रचनाकार संतोष रामाणे यांनी या मंदिराची रचना करताना मंदिर अभ्यासक उमाकांत रानिंगा यांच्याशी चर्चा करुन मंदिर उभारले आहे. त्याचबरोबर मंदिर स्थापत्यशास्त्रात दिलेल्या घटकांप्रमाणेच हे मंदिर उभारले गेले आहे. त्यामुळेच या मंदिराला सर्वोत्कृष्ट स्थापत्यरचना असा केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे.
Nagpur News: अद्भूत अशी कोराडीची महालक्ष्मी देवी, पाहा Video काय आहे आख्यायिका
तर असे हे अनोखे आताच्या काळातील नाग देवतेचे मंदिर आणि त्याचा परिसर देखील सुंदर पद्धतीने बांधण्यात आला आहे. एके ठिकाणी पडून असणारे मोठाले दगड आणून मंदिर परिसराभोवती दगडांची भिंत उभारण्यात आली आहे. अशा या अनोख्या नागेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट दिली पाहिजे.
गूगल मॅपवरून साभार
कुठे आहे मंदिर?
श्री नागेश्वर मंदिर, जिल्हा परिषद कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर - 416010
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.