पुणे, 01 ऑगस्ट : पुण्यातील पेशवांच्या काळात बांधली गेलेली महादेवाची मंदिरे म्हणून प्रामुख्याने अमृतेश्वर, ओंकारेश्वर, पार्वतीचे देवदेवेश्वर आणि रामेश्वर ही नावे डोळ्यांसमोर येतात. त्यातील सगळ्यात प्रख्यात मंदिर म्हणजेच मुठा नदीच्या काठी वसलेले ओंकारेश्वर मंदिर.( Omkareshwar Temple In Pune ) याच ओंकारेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात सोमवारी भक्तांच्या दर्शन घेण्यासाठी रांगा लागतात. श्रावण महिन्यातील सर्व सोमवार या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. (History Of Omkareshwar Temple या मंदिराचे महत्व, इतिहास आणि वैशिष्टे या विशेष रिपोर्टमधून पाहूया. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. हे पेशवेकालीन मंदिर असून याला मोठा इतिहास आहे. याबाबत मंदिराचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर यांनी मंदिराची माहिती सांगितली आहे. या मंदिराची निर्मिती पेशव्यांचे आध्यात्मिक गुरु शिवराम चित्रावत यांनी केली. त्यांनी पेशवे काळामध्ये या मंदिराची उभारणी केली आणि चिमाजी आप्पा पेशवे यांच्या देखरेखीखाली हे मंदिर उभारले गेले. 1734 मध्ये या मंदिराची पायाभरणी केली आणि 1736 मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. पेशवे काळामध्ये सर्वात मोठे मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. मंदिराला 9 कळस चिमाजी अप्पाचे मंदिरावरती विशेष प्रेम होते म्हणूनच मंदिराच्या परिसरामध्ये चिमाजी आप्पाची समाधी देखील आहे. ओंकारेश्वर मंदिर हे पुणे शहरातील ऐतिहासिक वारसा, प्रथम दर्जा, कायदेशीर मान्यता असलेले मंदिर आहे. मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला 9 कळस आहेत. या मंदिराची बांधणी विजापूर पद्धतीची असून महाराष्ट्रामध्ये अशा बांधणीचे मंदिर कुठे आढळून येत नाही, अशी माहिती धनोत्तम लोणकर यांनी दिली. अन्य मंदिरांमध्ये कीर्तिमुख उंबरठ्यात असतो. ओंकारेश्वर मंदिरामध्ये मात्र कीर्तिमुख कळसामध्ये आहे. या मंदिराने पुण्यातील सर्वात महाभयंकर असलेला पानशेत पूर देखील पाहिला आहे.
Nashik : श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जाण्यापूर्वी ‘ही’ बातमी वाचा!
मंदिरात हे उत्सव होतात साजरे या मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळी 5 ते 6 वाजल्यापासूनच भाविकांची गर्दी होते. तसेच रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले असते. या मंदिरामध्ये महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा आणि श्रावणातील सर्व सोमवार हे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विशेषत: श्रावणी सोमवारी अभिषेक केल्यामुळे पुण्य मिळते अशी भावना असल्यामुळे लोक श्रावणी सोमवारी मोठ्या प्रमाणात मंदिरात अभिषेक करण्यासाठी आणि दर्शनासाठी येत असतात. मंदिरातील आरतीची वेळ रात्री 8 वाजता या मंदिरामध्ये आरती होते आणि याचा भाविकांना देखील लाभ घेता येतो. मंदिरामध्ये बेल, फुले, फळे, पेढे आपण देवाला वाहू शकतो. या मंदिराचे बांधकाम अतिशय विशिष्ट पद्धतीचे जुने दगडी बांधकाम असल्यामुळे अनेक भाविक येथे ध्यानधारणा करण्यासाठी देखील येत असतात. पुण्यातील मुळा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आहे. यामुळे सौंदर्यदृष्टिकोनातून हे मंदिर नदी काठावर अधिकच खुलून दिसते.
गुगल मॅपवरून साभार
कसे पोहोचाल ओंकारेश्वर मंदिरात?
ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व पुल, 233 जवळ, चंद्रशेखर गोविंद आपटे रोड, शनिवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411030 हा मंदिराचा पत्ता आहे. यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल, तर 147 किलोमीटर अंतर आहे.औरंगाबादमधून येत असाल, तर 238 किलोमीटरचे अंतर आहे. बस आणि खासगी बसेसदेखील इथंपर्यंत पोहोचतात. स्थानिक नागरिकांशी संपर्क केल्यास ते देखील या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठीची माहिती सांगतात.

)







