मराठी बातम्या /बातम्या /religion /Shattila Ekadashi 2023: षटतिला एकादशीला टाळा या चुका; भगवान विष्णूंची लाभेल कृपादृष्टी

Shattila Ekadashi 2023: षटतिला एकादशीला टाळा या चुका; भगवान विष्णूंची लाभेल कृपादृष्टी

shattila-ekadashi-2023

shattila-ekadashi-2023

या दिवशी भगवान विष्णूंचं विधिवत पूजन केल्यास इच्छित फळ मिळतं

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई, 17  जानेवारी: हिंदू धर्मात पौर्णिमा, अमावास्येसह प्रदोष, एकादशी आणि चतुर्थी या दिवसांना अध्यात्मिक महत्त्व असतं. या दिवशी अनेक जण व्रतवैकल्यं, पूजा-विधी करतात. यात एकादशीला भगवान विष्णूंची विशेष आराधना केली जाते. वर्षभरात एकूण 24 एकादश्या असतात. यातल्या प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्त्व आहे. वैदिक शास्त्रांत एकादशीचं व्रत सर्वांत महत्त्वाचं आणि मोठं मानलं गेलं आहे. या दिवशी भगवान विष्णूंचं विधिवत पूजन केल्यास इच्छित फळ मिळतं, असं सांगितलं जातं. उद्या (18 जानेवारी 2023) षटतिला एकादशी आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या या एकादशीला विशेष व्रत केलं जातं. एकादशीच्या व्रतासंबंधी काही नियम सांगितले गेले आहेत. या दिवशी काही गोष्टी टाळाव्यात, तर काही गोष्टी आवर्जून कराव्यात, असं मानलं जातं.

पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची विधीवत पूजा केली जाते. या दिवशी भाविक भगवान विष्णूंना तीळ अर्पण करतात. या निमित्ताने तीळ दान आणि सेवनही केले जातात. यामुळे जीवनातल्या सर्व समस्या दूर होतात, असं मानलं जातं. वर्षभरात एकूण 24 एकादश्या येतात. यात प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्त्व आहे. वैदिक शास्त्रात एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं गेलं आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, एकादशीच्या व्रताचा थेट मन आणि शरीरावर परिणाम होतो. यामुळे चंद्राचा नकारात्मक परिणाम रोखला जातो. या व्रतामुळे ग्रहांचे दुष्परिणाम बऱ्याच अंशी कमी होतात. उद्या षटतिला एकादशी आहे. त्यामुळे या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात हे माहिती असणं गरजेचं आहे.

षटतिला एकादशीला तिळाला विशेष महत्त्व असतं. या दिवशी तुम्ही तिळाचे पदार्थ दान करू शकता. या दिवशी भगवान विष्णूंना तिळाचा नैवेद्य दाखवणं शुभ मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंना तीळ अर्पण केल्यास मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं मानलं जातं. षटतिला एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने तिळाचं उटणं लावून आणि पाण्यात तीळ घालून त्याने स्नान करावं. षटतिला एकादशीच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर तिळाने तर्पण केल्यावर पितरांचा आशीर्वाद मिळतो.

षटतिला एकादशीच्या दिवशी चुकूनही वांगी आणि तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत. या दिवशी मांसहार, मद्यपान करून नये. तसंच ब्रह्मचर्याचं पालन करावं. व्रताचा संकल्प केलेल्या व्यक्तीनं बेड किंवा पलंगावर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपावं. षटतिला एकादशीच्या दिवशी अपशब्द उच्चारणं टाळावं. तसंच खोटं बोलू नये. या एकादशीच्या दिवशी सकाळी दात कोरू नयेत. तसंच या दिवशी झाडाची फुलं, पानं किंवा डहाळ्या तोडू नयेत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion