मुंबई, 18 मार्च: हिंदू धर्मातील सर्व तिथींमध्ये एकादशी तिथी सर्वात महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला व्रत करण्याचा नियम आहे. एकादशी तिथीला भगवान विष्णूची पूजा करून व्रत केल्यास भक्तांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असे शास्त्रात सांगितले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. यावर्षी हे व्रत 18 मार्च 2023 रोजी शनिवारी पाळले जाणार आहे.
शास्त्रात सांगितले आहे की, जाणूनबुजून किंवा नकळत माणूस असे काही पाप करतो, ज्याची शिक्षा त्याला या जन्मात आणि पुढील जन्मात भोगावी लागते. पापे टाळण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व आणि त्याचे नियम जाणून घेऊया.
सुख-समृद्धीसाठी करा पापमोचनी एकादशीचे व्रत, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व
धार्मिक ग्रंथ आणि पुराणात सांगितले आहे की, एकादशीचे व्रत केल्याने माणसाचे सर्व दुःख आणि कष्ट दूर होतात. दुसरीकडे पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने साधकाची नकळत झालेल्या चुकांपासून मुक्तता होते आणि त्याला सहस्त्र गोदान म्हणजेच 1000 गोदानाचे पुण्य मिळते. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येचे पातक लागले होते, तेव्हा या दोषातून मुक्त होण्यासाठी त्यांनी कपालमोचन तीर्थात स्नान आणि तप केले होते. तसेच पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात.
पापमोचनी एकादशी व्रताचे नियम
जाणूनबुजून केलेल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी साधकाने निर्जल व्रत करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. जर व्यक्तीचे आरोग्य चांगले नसेल तर तो फळ किंवा पाणी घेऊन उपवास करू शकतो. निर्जला व्रत ठेवण्यापूर्वी केवळ दशमी तिथीला सात्विक भोजन घ्यावे आणि एकादशी तिथीला विधिनुसार भगवान विष्णूची पूजा करावी. पापमोचनी एकादशीच्या दिवशी जागृत राहून भगवान विष्णूची आराधना केल्याने साधकाला या जन्मी तसेच मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते, असेही शास्त्रात सांगण्यात आले आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Ekadashi, Lifestyle, Religion