अभिषेक माथूर, प्रतिनिधी हापूर, 12 जुलै : उत्तर भारतात 4 जुलैला श्रावण मास सुरू झाला. त्यामुळे तेथील मंदिरांमध्ये सध्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पहाट होताच भाविक मंदिरात हजर होतात. अशातच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या विविध भागांतील शिव मंदिरात नंदीची मूर्ती दूध आणि पाणी पित असल्याच्या घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. त्यामुळे हा नेमका चमत्कार आहे, अंधश्रद्धा आहे की आणखी काय…असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. एकामागून एक समोर येणाऱ्या या घटनांमुळे आता शेकडो भक्त दूध, पाणी, चमचे, वाटी आणि ग्लास घेऊन मंदिरात दाखल होत असल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय मंदिरातील वातावरण प्रसन्न राहावं यासाठी दररोज भजन-कीर्तनांचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. भाविक येथे भक्तिमय वातावरणात अक्षरश: तल्लीन होऊन जातात.
हापूरच्या सिरोधान गावात एका महिलेने शिवमंदिरात जाऊन नंदीला दूध अर्पण केलं, तेव्हा नंदीने दूध प्यायल्याचं पाहून महिलेला प्रचंड आनंद झाला. कोणाला सांगू आणि कोणाला नको, अशी काहीशी तिची अवस्था होती. पाहता पाहता ही गोष्ट गावभर पसरली आणि गावातील इतर भाविकही नंदीला दूध अर्पण करण्यासाठी मंदिरात दाखल झाले. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. अहो आश्चर्य! या मंदिरात चक्क नंदीची मूर्ती पिते दूध, मूर्तीला दूध पाजण्यासाठी नागरिकांची झुंबड आता विविध शिवमंदिरांत महिला, लहान मुलं आणि पुरुष नंदीला दूध, पाणी अर्पण करताना दिसतात. तर नंदी महाराज ते पितातही. काही लोक हा चमत्कार मानत आहेत, तर काही लोकांनी ही अंधश्रद्धा असल्याचं म्हटलं आहे. काहीजणांनी यामागे शास्त्रीय कारण असल्याचंही नमूद केलं आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)