मराठी बातम्या /बातम्या /religion /

माघी गणेशोत्सव: गणेश जयंतीविषयी सांगितल्या जातात या पौराणिक कथा

माघी गणेशोत्सव: गणेश जयंतीविषयी सांगितल्या जातात या पौराणिक कथा

गणेश जयंतीच्या कथा

गणेश जयंतीच्या कथा

या चतुर्थीचे वैभव हे आहे की, ही या पृथ्वीची चतुर्थी आहे. महामुनी कश्यप तथा देवी अदितीच्या आश्रमात झालेला हा पृथ्वीवरील अवतार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 24 जानेवारी : श्री गणेशाच्या हजारो अवतारांचे वर्णन श्रीमुदगल पुराणकारांनी केलेले आहे. या प्रत्येक अवताराचे प्रयोजन मातापिता, राक्षसवध, भक्तसंरक्षण इ. लीला वेगवेगळ्या आहेत. माघी गणेशोत्सवा निमित्त श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांनी गणेश जयंतीविषयी सांगितलेल्या कथा जाणून घेऊ.

आपणास सामान्यत: गणेशजन्माची एकच कथा ज्ञात असते. तीच भाद्रपदी चतुर्थीला आणि तीच माघी चतुर्थीलाही सांगून आपण मोकळ होतो. वास्तविक ती कथा आहे कार्तिक शुध्द चतुर्थीची. त्या दिवशी श्रीगणेशांचा "उमांगमलज'' नामक अवतार झाला. आपणास ज्ञात असलेली सर्वश्रुत कथा त्या चतुर्थीची आहे.

आज आहे माघ शु. चतुर्थी. आजचा गणेशजन्म आहे श्रीविनायक जन्मोत्सव. या चतुर्थीचे वैभव हे आहे की, ही या पृथ्वीची चतुर्थी आहे. महामुनी कश्यप तथा देवी अदितीच्या आश्रमात झालेला हा पृथ्वीवरील अवतार आहे. श्रीमन मुदगल पुरणाच्या द्वितीय खंडात हे विनायक चरित्र खूप विस्तारपूर्वक वर्णिले आहे. संक्षिप्तत: त्याचा आढावा घेऊ.

गौड प्रांतात रुद्रकेतू तथा शारदा नामक दाम्पत्याला जुळी अपत्ये झाली. त्यांची देवांतक तथा नरांतक अशी नावे रूढ झाली. देवर्षी नारदांनी या दोघांना शिवपंचाक्षरी महामंत्राचा उपदेश करून तपाचरणास लावले. वरदान रुपात "श्रीब्रह्मदेव निर्मित कोणत्याही पदार्थाने मृत्यू नसावा'' असा अद्भुत वर भेटला आणि मग जणू आपण अमर झालो या भावनेला त्यांची राक्षसीवृत्ती जगाला त्रस्त करू लागली. त्रीभूवनावर सत्ता स्थापन झाली. देवता स्वलोकातून निर्वासित झाल्या. अरण्यवासी ठरल्या. मग यांनी देवता आहाररूप यज्ञाचा विनाश सुरू केला. देवतांना उपवास घडू लागले आणि त्यांच्या या दु:खाने सर्वाधिक व्यथित झाली ती देवमाता आदिती.

श्रीकश्यपांसमोर तिने आपली व्यथा मांडली आणि उत्तररुपात तिला श्रीगणेशोपासना रहस्य प्राप्त झाले. त्या आधारे तिने कठोर तपाचरण केले आणि फलरुपात श्रीगणेशदर्शन तथा पुत्ररुपात आश्रमात अवतरण्याचे त्यांचे श्रीवचन लाभले.इकडे देवांतक नरांतकच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनीही अंतिम उपाय रुपात श्रीगणेशाराधन सुरू केले आणि या सगळ्यांच्या आर्ततापूर्ण हाकेला प्रतिसाद रुपात माघ शु. चतुर्थीला कश्यपगृही भगवान श्रीविनायक रुपात अवतीर्ण झाले.

या अवतारात अनेकानेक बाललीला पहावयास मिळाल्या. श्रीमुदगलपुराणापेक्षा या बाललीलांचे कौतुक श्रीगणेशपुराणाच्या क्रीडाखंडात अधिक व्यापक रीतीने शब्दबद्ध करण्यात आलं आहे. यातील अनेक लीलांचे तात्पयीर्थ मोठे अद्भुत आहेत. उदा. श्री विनायकाच्या उपनयन प्रसंगी अनेक देवतांनी त्यांना भेट रुपात शस्त्रास्त्रे दिली. वरपांगी पाहता उपनयन तर शास्त्राभ्यासाचा आरंभ. मग शस्त्रे का दिली? तर जोवर शास्त्र आणि शस्त्र यांचा समन्वय होत नाही तोवर देवांतक, नरांतक या वृत्तींचा विनाश संभव नाही.

पुराणकारांनी वर्णिलेले राक्षस या केवळ व्यक्ती नसतात तर त्या प्रवृत्ती असतात. देव कार्यास विरोध करतात ते देवांतक. तर मानवीय मूल्यांना उध्वस्त करतात ते नरांतक. यांच्या निर्दालनाकरीता अनिवार्य आहे. हा या कथेचा भाव समजून घेणे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे.

गंधर्वकथा ही अशीच रोचक कथा. गंधर्वाचे राजे हाहा आणि हुहु हे कश्यपाश्रमात आले. बालविनायक तेथे खेळत होते. या गंधर्वांनी पंचायतन पूजा आरंभिली. श्रीगणेश, श्रीविष्णू, श्रीशंकर, श्रीदेवी तथा श्रीसूर्य या पाचही देवतांचे नियमित पूजन करण्यास पंचायतन पूजन असे म्हणतात. याचे मूळ कारण सगळ्या मार्गांचा समन्वय असते. मात्र, पाचांची पूजा करताना त्यांना वेगवेगळे मानण्यात आणि आम्ही पाचांचीही पूजा करतो याचाच अभिमान आणि पुढे जाऊन अहंकार वाटणाऱ्या गंधर्वांना श्री विनायकाने धडा शिकवला.

श्रीविनायकांनी त्या पाचही मूर्ती गिळून टाकल्या. मग आकांडतांडव करणाऱ्या गंधर्वांना स्वत:च पाचही रुपात दर्शन दिले. सगळे काही "मोरयाच'' आहे हे समजावून सांगणारी ही मोरया कृती आहे. श्री विनायकांच्या लीला स्थानात कश्यपाश्रमाशिवाय काशीक्षेत्रालाही मोठे वैभवशाली स्थान आहे.

काशीराज्याच्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने श्रीविनायक काशी नगरीत आले. तेथे त्यांनी सगळ्याच गावकऱ्यांना लळा लावला. सगळ्यांनाच वाटू लागले की श्रीविनायक आपल्या घरी यावेत. हा आग्रह खूपच वाढला आणि मग एकेदिवशी श्रीविनायकांनी घोषित केले उद्या आम्ही सगळ्यांच्याच घरी येऊ. ही वार्ता सगळ्या गावात पोहोचली. गावाबाहेर एका झोपडीत राहणाऱ्या महर्षी शुक्ल तथा देवी विद्रुमा नामक दाम्पत्याला ही वार्ता कळली. पण आनंदव्यक्त करावा ही व्यथा हेच कळेना. कारण प्रभू घरी येणार हा आनंद पण स्वागताला घरात फुटकी कवडीही नाही याचे दु:ख.

शेवटी आहे त्यासह स्वागताची तयारी सुरु झाली. राखेने रांगोळी, दभीने ध्वजा, फुलाने आसन तयार करण्यात आले. पण खायला काय देणार? शेवटी भिक्षा मागितली. मिळेल त्या सगळ्याचे पीठ करून लापसी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी राजवैभवाने स्वागत करणाऱ्या सगळ्यांना सोडून भगवान श्रीशुक्लांच्या झोपडीतच गेले. भगवान वैभवाचा नव्हे तर भावाचा भुकेला असतो हे सांगणारी ही कथा.

विनायक अवताराची वैभवशाली कथा आहे चतुर्थी वैभव कथनकारी श्री भृशुंडीकथा.

एके दिवशी सकाळीच काशीराजा श्रीविनायकांच्या महाली आले आणि त्यांनी जे दृश्य पाहिले त्यावर त्यांचा विश्वासच बसेना. कारण श्री विनायकांची अशा दिव्यतम उपचारांनी श्रीविनायकांची पूजा संपन्न झाली होती की जे उपचार काशीराजाला राजवाड्यात सुद्धा संभव नव्हते.

ही पूजा कोणी? कधी? कशी? केली असे अनेक प्रश्न राजाच्या मनात आले. राजवाड्यात येऊन कोणी अशी पूजा केली कशी? आणि मग ते आपल्याला कसे कळले नाही? शेवटी काशीराजाने श्रीविनायकांनाच प्रश्न केला. उत्तर रुपात महान गाणपत्य महर्षी श्रीभृशुंडींचे महात्म्य कळले.

हे वाचा - गणेश जयंतीला घ्या पुण्यातील 5 गणपती मंदिरात दर्शन, तुमचा दिवस जाईल शुभ!

राजाने त्यांच्या दर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. विनायककृपेने राजा अमलाश्रमात (नामलगाव जि. बीड) पोहोचला आणि त्याच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. भक्त भगवदरुप होते. महर्षीच्या भ्रुमध्यातून सोंडच फुटली होती. त्यांचे नावच होते महर्षी भृशुंडी. जगातील हे एकमेव उदाहरण. राजाने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. महर्षी भृशुंडींनी केलेली मानसपूजा विनायकास प्रत्यक्षरुपात पोहोचल्याचे सांगितले तथा दर्शनार्थ येण्याची प्रार्थना केली.

आश्चर्याचा आणखी एक धक्का तेव्हा बसला जेव्हा महर्षीनी विचारले विनायक गजशुंडाधारी आहेत का? राजा म्हणाला नाही. महर्षी म्हणाले "मग मी दर्शनार्थ येणार नाही.'' महर्षी भृशुडींच्या या अत्युत्कट एक निष्ठेच्या फलरुपात श्रीविनायक आपल्या मूळ गजशुंडा रुपात नटले. भक्तीमार्गातील या एकनिष्ठेला अधोरेखित करणारा अवतार आहे श्रीविनायक अवतार.

हे वाचा - घरबसल्या मुंबईच्या सिद्धीविनायकाला घाला साकडं; लाईव्ह लिंकद्वारे घ्या थेट दर्शन

श्रीविनायक अवतारातील एक वैशिष्ठयपूर्ण कथाभाग म्हणजे देवी सिद्धीच्या अधिपत्याखाली स्थापित स्त्री सैन्य. नारी सैन्याचा हा कदाचित जगातील प्रथम प्रयोग असावा.

श्रीविनायक अवतारातील अंतिम कथा अवतरणकारण रूप लीला म्हणजे देवांतक नरांतक वध. अशा रुपात आपल्या या अवतारातील विविध लीला संपन्न करून श्रीगणराजप्रभू आपल्या स्वानंद लोकी परतले. अशा या दिव्यस्वरूपातील कृतीयुगीन अवताराची अवतरण तिथी आहे माघ. शु. चतुर्थी.

संदर्भ ग्रंथ : श्री मुद्गल महापुराण.

First published:

Tags: Ganesh chaturthi, Maghi Ganesh Jayanti, Religion