मुंबई, 17 मार्च: या वेळी 22 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि या काळात तुम्ही 9 दिवस उपवास करण्याचा विचार करत असाल तर काही पथ्य पाळणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार, उपवासात सर्व प्रकारचे मसाले खाऊ नयेत. उपवास करताना काही खाद्यपदार्थ आणि मसाले टाळावेत. 9 दिवस उपवास करताना तुम्ही कोणत्या पदार्थांचे सेवन करू शकता याचीही सविस्तर माहिती येथे देत आहोत.
चैत्र नवरात्र 22 ते 30 मार्चपर्यंत असेल. देशभरातील देवी दुर्गेचे भक्त हा 9 दिवसांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. नवरात्र साधारणपणे वर्षाच्या वेगवेगळ्या महिन्यांत चार वेळा साजरी केली जाते. शारदीय नवरात्री, चैत्र नवरात्री, माघ गुप्त नवरात्री आणि आषाढ गुप्त नवरात्री अशा चार नवरात्री असतात.
शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्रीचे धार्मिक महत्त्व अधिक सांगितले गेले आहे, म्हणून त्या पूर्ण उत्साहात देशभरात साजऱ्या केल्या जातात. यादरम्यान देशभरातील देवीचे भक्त नवरात्रीचे उपवास पाळतात आणि उपवासात सात्विक अन्न खातात.
9 दिवसांच्या उपवासात या पदार्थांचे करू नका सेवन
उपवासात कांदा, लसूण, गव्हाचे पीठ, तांदूळ, वांगी, मशरूम टाळले जातात. उपवासात काही मसाल्यांचे सेवनही टाळावे. या वेळी गरम मसाला, धने पावडर, हळद, हिंग, मोहरी, मेथीदाणे इत्यादींचे सेवन करू नये.
उपवास करताना या गोष्टींचे करा सेवन
उपवासात राजगिरा पीठ, साबुदाणा, पाणी, बटाटा, रताळे, करवंद, विविध फळे, भगरीचे पीठ, गाजर आणि काकडी इत्यादींचे सेवन केले जाऊ शकते. याशिवाय उपवासात जिरेपूड, काळी मिरी पावडर, हिरवी वेलची, जायफळ, लवंग, दालचिनीचे सेवन करता येते. नवरात्रीच्या उपवासात सात्त्विक भोजनात सामान्य मिठाऐवजी सैंधव मीठ खाल्ले पाहिजे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion