कोल्हापूर, 7 डिसेंबर : कोल्हापूरचे फुलेवाडी हे एक प्रमुख उपनगर आहे. या उपनगराला अनेक जण येथील दत्त मंदिरामुळे ओळखतात. . फुलेवाडी परिसरात रंकाळा आडवा पाट कुरण इथे गवताचे कुरण होते. अनेकांची जनावरे गवत चरण्यासाठी इथे यायची आणि त्यासाठी कोल्हापूर दरबारला पट्टी भरली जात असे. येथीलच कामदार दत्तू राऊत यांच्या स्मरणार्थ श्रीपतराव बोंद्रे आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हे मंदिर उभारले गेले असल्याची माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त नागोजीराव पाटील यांनी दिली.येथील दत्तात्रयाचं मंदिर हे अनेकांचं श्रद्धास्थान असून याला अगदी स्वातंत्र्य लढ्याचाही इतिहास आहे
कसे आहे मंदिर?
हे मंदिर आत्ताच्या काळातील आहे. दोन मजली असलेले मंदिर हे मुख्य मंदिर आणि सभागृह अशा स्वरूपाचे आहे. समोर गेटबाहेर दोन्ही बाजूला पार आणि गेटवर सिंहांची प्रतिकृती आहे. मंदिराच्या समोरच कामदार दत्तू राऊत यांची अस्थी समाधी आहे. संगमरवरी पायऱ्या चढून गेल्यावर समोर मंदिराचा मोठा सभामंडप आणि मंदिराचा गाभारा निदर्शनास पडतो. सभामंडपात सर्वच बाजूला भिंतींवर देव-देवतांचे, संतांचे आणि महापुरुषांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. गाभाऱ्यात सुंदर अशी संगमरवरी दगडातील घडीव दत्त मूर्ती आहे. या मूर्तीचे रूप अगदी मोहक वाटते. त्याशेजारी उत्सव मुर्ती, नागदेवता, गाईची मूर्ती देखील ठेवण्यात आलेली आहे. ही दत्त मूर्ती साधारण नाहीय. या मूर्तीचा देखील एक रंजक इतिहास असल्याचे पाटील यांनी सांगितले.
भक्ताच्या नावानं ओळखलं जाणारं पुण्यातील 125 वर्ष जुनं दत्त मंदिर, Video
स्वातंत्र्य चळवळीशी संबंध
भारतावर इंग्रजांची सत्ता होती तेव्हा 1929 साली कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाणी सर लेस्ली विल्सन या इंग्रज अधिकाऱ्याचा पुतळा उभारला गेला होता. शुभ्र संगमरवरी दगडात घडवलेला 15 फूट उंचीचा हा पुतळा होता. कोल्हापुरातील स्वातंत्र्य सैनिकांनी या पुतळ्याच्या चेहऱ्यावर हातोड्याने घाव घालत कान, नाक तोडले होते.
कोल्हापूरच्या इतिहासात या घटनेचा विल्सन नोज कट म्हणून उल्लेख आहे. काही दिवस झाकून ठेवत 1944 साली विद्रुप अवस्थेतील हा पुतळा हटवण्यात आला. त्यानंतर 1945 मध्ये भालजी पेंढारकर यांच्या पुढाकाराने याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.
श्रीदत्त जयंतीनिमित्त WhatsApp स्टेटसला ठेवा ‘हे’ सुंदर शुभेच्छापर संदेश
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोल्हापूरमधील भंगार वस्तुंचे व्यापारी मेहता यांनी विल्सन यांचा हा पुतळा खरेदी केला. श्रीपतराव बोंद्रे यांनी संगमरवरी दगडासाठी मेहता यांच्याकडून विल्सन यांच्या पुतळ्याचा धडाचा तीन फुटांचा भाग विकत घेतला. राजस्थानहून कारागीर बोलावून या संगमरवरी दगडापासून सुबक अशी दत्त मूर्ती साकारण्यात आली. दत्त मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, अशी माहिती मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली आहे.
गुगल मॅपवरून साभार
मंदिराचा पत्ता
श्री दत्त मंदिर, फुलेवाडी, कोल्हापूर - 416010
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Datta Jayanti, Kolhapur, Local18, Religion